स्फोटकांच्या साहित्यासह दोन दुचाकी जप्त
By Admin | Updated: December 9, 2014 22:46 IST2014-12-09T22:46:50+5:302014-12-09T22:46:50+5:30
चिमूर तालुक्यातील भीसी वनक्षेत्रातंर्गत येणाऱ्या एफडीसीएमच्या राखीव वनक्षेत्रावरील कक्ष क्रमांक १७ मध्ये मंगळवारी स्फोटकांच्या साहित्यासह दोन दुचाकी आढळून आल्या. ताडोबा अंधारी व्याघ्र

स्फोटकांच्या साहित्यासह दोन दुचाकी जप्त
शिरपूर वनक्षेत्रातील घटना : वन्यजीवांच्या शिकारी टोळीचा संयश
चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील भीसी वनक्षेत्रातंर्गत येणाऱ्या एफडीसीएमच्या राखीव वनक्षेत्रावरील कक्ष क्रमांक १७ मध्ये मंगळवारी स्फोटकांच्या साहित्यासह दोन दुचाकी आढळून आल्या. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर बफर क्षेत्रात ही घटना उघडकीस आल्याने वनविभागाची झोप उडाली आहे.
या दोन्ही दुचाकींचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी होत असावा, याची चौकशी सुरू असली तरी, वन्य जीवांच्या शिकारीसाठी आणि ठार केलेल्या प्राण्यांचे मास वाहून नेण्यासाठी या दुचाकींचा वापर होत असल्याचे सकृतदर्शनी उघड झाले आहे. या प्रकरणी जांभुळघाटमध्ये राहणाऱ्या मोहनसिंग जुन्नी नामक व्यक्तीला संशयावरून ताब्यात घेण्यात आले असून या घटनेचे तार त्याच्याशी जुळत असल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्राप्त माहितीनुसार, वनविकास महामंडळाच्या राखीव वनक्षेत्रावर दुपारी दोन दुचकी वाहने संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती मिळाली. यावरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. मात्र दुपारनंतरही त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ती दोन्ही वाहने जप्त केली. या वाहनांपैकी एक स्लेंडर असून तिचा क्रमांक एमएच ४०/जी-६८७३ असा आहे. तर, दुसरी डिस्कव्हर असून तिचा क्रमांक एमएच ३४/एएल-४३२२ असा आहे. या वाहनांची तपासणी केली असता, एका वाहनावर एक पिशवी अडकविलेली आढळली. यात, स्फोटकांचे साहित्य, बारूद, स्क्रू, गोळ्या, छर्रे, बारूदीचे लहान हातगोळे असे विध्वसंक साहित्य आढळले. दुसऱ्या वाहनाच्या मागे मोठे कॅरिअर लावलेले असून जनावराचे मास लादून नेले जाईल, एवढा त्याचा आकार आहे. या प्रकरणी, वन परिक्षेत्र अधिकारी मल्लेलवार यांनी भीसी पोलीस स्टेशनला सूचना दिली. वृत्त लिहीपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. असा प्रकार पहिल्यांदाच आढळला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)