ताडोबातील दोन वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडणार !

By राजेश मडावी | Published: April 27, 2024 02:28 PM2024-04-27T14:28:46+5:302024-04-27T14:30:30+5:30

एनटीसीएकडून अनुमती : मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मुक्काम हलणार

Two tigers in Tadoba will be released in the Sahyadri Tiger Reserve! | ताडोबातील दोन वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडणार !

Two tigers in Tadoba will be released in the Sahyadri Tiger Reserve!

चंद्रपूर : अत्यंत अनुकूल नैसर्गिक परिस्थितीने वाघांची संख्या झपाट्याने वाढलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघांना मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) अनुमती दिल्याने वन विभागाकडून पुढील कार्यवाहीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा अधिवास सुरक्षित करण्यासाठी यापूर्वी मर्यादित प्रयत्न झाले. परिणामी अधिवास व वाढीसाठी पोषक वातावरण आणि खाद्यान्न अशा घटकांशी पूरक स्थिती नव्हती. मात्र, सर्व कमरता दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम अमलात आणल्याने स्थिती सुधारली. तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी सागरेश्वर अभयारण्यातून तृणभक्षक प्राणी स्थलांतरित करण्यात आले. यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेचेे (डब्ल्यूआयआय) तांत्रिक सहकार्य देखील अत्यंत उपयुक्त ठरल्याची माहिती सूत्राने दिली.

ताडोबातून वाघ हलविण्याचे कारण काय ?

भारतीय वन्यजीव संस्थेने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विष्ठेच्या ४४ नमुन्यांचे विश्लेषण केले होते. त्यातील सात नमुने हे वाघांचे होते. मात्र, हे सातही वाघ स्थलांतरित होते. २०१४ च्या गणनेत या प्रकल्पात वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत. मात्र, तेथे वाघ कधीच स्थिरावला नाही. डब्ल्यूआयआयच्या गणनेतूनही सह्याद्रीत वाघांची संख्या शून्य असल्याची माहिती पुढे आली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात २१-२२ वाघ सामावून घेण्याची क्षमता असताना सुरक्षित अधिवास तयार होऊ शकला नाही. मात्र, आता अनुकूल स्थिती तयार झाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दोन आणि त्यानंतर सहा असे एकूण आठ वाघ सह्याद्री प्रकल्पात सोडण्यात येणार असल्याचे समजते.

महाराष्ट्रात किती वाघ आहेत?

सद्य:स्थितीत महाराष्ट्रात ४४६ वाघ आहेत. त्यातील २५० पेक्षा अधिक वाघ एकट्या ताडोबा-अंधारी प्रकल्पातील आहेत. विदर्भात वाघांची संख्या २३ टक्क्यांनी वाढल्याचे अहवाल सांगतात. चंद्रपूरचे मुख्य वनसरंक्षक तथा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनातील उपक्रमांनी ताडोबात वाघांची संख्या वाढली. ताडोबातील दोन वाघांना स्थलांतर करण्याची प्रक्रिया ज्येष्ठ वनाधिकारी व संशोधक रमेश यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.

 
पहिल्या टप्प्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघांना सह्याद्री प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. त्याबाबतची तयारी व वाघांची ओळखही निश्चित झाली. वाघांना सोडल्यानंतर मागोवा घेण्यासाठी तज्ज्ञांची चमू व सॅटेलाइट कंट्रोल रूम सज्ज करण्यात आली. अंतिम कार्यवाही पुढील महिन्यात केली जाईल.

-महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

 

ताडोबातून वाघ सोडण्याबाबत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही त्यादृष्टीने शास्त्रशुद्ध तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात दोन वाघ सोडण्याचा प्रस्ताव आहे. सोडण्यात येणारे एकूण आठ वाघ हे ताडोबा-अंधारी प्रकल्पातीलच असतील.

-डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसरंक्षक तथा क्षेत्रसंचालक ताडोबा व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर

Web Title: Two tigers in Tadoba will be released in the Sahyadri Tiger Reserve!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.