होळीच्या पर्वावर दोन हजार पोलिसांचा पहारा
By Admin | Updated: March 20, 2016 00:50 IST2016-03-20T00:50:07+5:302016-03-20T00:50:07+5:30
दारूशिवाय धुळवड, असे समिकरणच जुळत नाही. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने मागील वर्षीप्रमाणेच यंदाही मद्यप्रेमींची चांगलीच गोची होणार आहे.

होळीच्या पर्वावर दोन हजार पोलिसांचा पहारा
दारू तस्करीच्या विरोधात कसली कंबर : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आदेश
चंद्रपूर : दारूशिवाय धुळवड, असे समिकरणच जुळत नाही. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने मागील वर्षीप्रमाणेच यंदाही मद्यप्रेमींची चांगलीच गोची होणार आहे. पुढील आठवड्यात होळीसह अनेक सणोत्सव असल्याने परजिल्ह्यातून चंद्रपुरात दारूची मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी याविरुद्ध आतापासूनच फिल्डींग लावली आहे. होळीच्या पर्वावर जवळपासून दोन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दारू तस्करी व मद्यपींवर करडी नजर ठेवणार आहेत.
यासाठी सोमवारपासून पोलीस यंत्रणेकडून विशेष मोहिम राबविली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी शनिवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी व ठाणेदारांची विशेष बैठक घेऊन अवैध दारू तस्करीच्याविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या विशेष मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत हे करणार असून या मोहिमेअंतर्गत कायदा व सुव्यवस्था, दारू विक्रेते, व मद्यपी यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासोबतच येत्या २१ मार्च रोजी जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीचे आयोजनही करण्यात आले (प्रतिनिधी)
१८ ठिकाणी नाकेबंदी
जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी झाली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा जिवाचे रान करीत असतानाही पोलिसांचा डोळा चुकवून जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारू आणली जात आहे. त्यातच होळीचा सण असल्याने मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात १८ ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. सोबतच एक विशेष कारवाई पथकही गस्त घालणार आहे. या काळात कुणी मद्यप्राशन करून वाहन चालविताना दिसल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाणार असून यासाठी प्रत्येक वाहनधारकांची मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
दारू विक्रेते परांगदा
होळीच्या पर्वात पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या धसक्याने शहरातील अनेक दारू विक्रेते शहरातून परांगदा झाले आहेत. त्यामुळे मद्यपींची चांगलीच गोची झाली आहे. काही मद्यपींनी अगोदरच होळीची ‘सोय’ करून ठेवल्याची चर्चा आहे.