दोन महिन्यांपासून घंटागाड्या पडल्या बेवारस
By Admin | Updated: September 2, 2016 00:53 IST2016-09-02T00:53:28+5:302016-09-02T00:53:28+5:30
दीड ते दोन महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेतून पंचायत समिती जिवती येथे गावातील कचरा जमा करण्यासाठी १५ घंटागाड्या आल्या.

दोन महिन्यांपासून घंटागाड्या पडल्या बेवारस
गाड्यांची दैनावस्था : म्हणे विषम संख्येमुळे निर्माण झाला पेच
संघरक्षित तावाडे जिवती
दीड ते दोन महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेतून पंचायत समिती जिवती येथे गावातील कचरा जमा करण्यासाठी १५ घंटागाड्या आल्या. वास्तविक या कचरागाड्या ग्रामपंचायतीला केव्हाच वाटप व्हायला हव्या होत्या. परंतु वाटप न झाल्याने आणि संबंधित विभागाच्या हलगर्जीपणाने सदर घंटागाड्यांचीच ऐसीतैशी झाल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हा परिषद क्षेत्र दोन आहेत आणि गाड्या विषम संख्येत आल्या आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे, हे विशेष.
गेल्या कित्येक दिवसांपासून या गाड्या पटांगणात बेवारस स्थितीत आहेत. कुलूप अस्ताव्यस्त पडलेले असून घंटागाड्याही जंगलेल्या दिसत आहेत. वार्षिक दोन लाखाच्या वर उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीला गावातील कचरा उचलून गावाच्या बाहेर नेऊन टाकण्यासाठी या घंटागाडया मिळतात. त्याप्रमाणे पंचायत समिती विभागाकडून २५ गाड्या मिळाव्यात, असा प्रस्ताव जानेवारी २०१६ ला पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडून २५ ऐवजी १५ घंटागाड्या जिवती पंचायत समितीसाठी पाठविण्यात आल्या. पण या १५ गाड्या नेमक्या कोणत्या ग्रामपंचायतींना द्यायच्या, त्याची यादी जिल्हा परिषदेतून आम्हाला प्राप्त न झाल्याने आम्ही सदर घंटागाड्या वाटप केल्या नाही, असे विस्तार अधिकारी एन. बी. कुळमेथे यांनी सांगितले. एवढेच नाही तर जिवती तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन क्षेत्र असून त्या जिल्हा परिषद सदस्यांना उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विश्वासात घेऊन त्या-त्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीची यादी पहायला हवी होती. जेनेकरुन घंटागाड्या वाटप करण्यास सोईस्कर झाले असते. गावातील कचरा उचलण्यास ही घंटागाडी गावात फिरते, तेव्हा त्या गाडीला असलेल्या घंटीच्या आवाजाने गाडी आल्याचे लोकांना कळते. मात्र वाटप होण्यापूर्वीच गाड्यांच्या घंट्या गायब झाल्याने आता घटींचा नाद येणार की नाही, हे सांगणे कठीण आहे.
घंटागाडीची संख्या विषम असून दोन जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. त्यामुळे कोणत्या क्षेत्राला कमीअधिक वाटप करावे, हा माझ्यासमोर पेच निर्माण झाला असून जिल्हा परिषदेतून यादी आली असती तर वाटप करणे सोईचे झाले असते.
- एम. बी. कुळमेथे, विस्तार अधिकारी, समाजकल्याण विभाग, जिवती