बल्लारपुरातील सात चोऱ्यातील दोन लाखांवर ऐवज जप्त

By Admin | Updated: February 14, 2016 00:54 IST2016-02-14T00:54:43+5:302016-02-14T00:54:43+5:30

शहरात एका महिलांच्या टोळीने घरी कोणी नसताना तब्बल सात ठिकाणी घरफोडी केली. घरफोडीतून त्यांनी सोने, चांदीचे दागिने व नगदी रक्कम लंपास केली.

Two lakh rupees of seven thieves seized in Ballarpur | बल्लारपुरातील सात चोऱ्यातील दोन लाखांवर ऐवज जप्त

बल्लारपुरातील सात चोऱ्यातील दोन लाखांवर ऐवज जप्त

बल्लारपूर पोलिसांची कारवाई : तीन महिला आरोपींना अटक
बल्लारपूर : शहरात एका महिलांच्या टोळीने घरी कोणी नसताना तब्बल सात ठिकाणी घरफोडी केली. घरफोडीतून त्यांनी सोने, चांदीचे दागिने व नगदी रक्कम लंपास केली. याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी तपासाला गती देत तीन महिला आरोपींना अटक केली. या कारवाईत २ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
माया अशोक ठाकरे ऊर्फ किस्मत अली (२०), पूजा गोलू ठाकरे (२२) व रूपा गोलु ठाकरे (२०) अशी आरोपींची नावे असून त्या बल्लारपुरातील शांतीनगर भागातील रहिवासी आहेत. येथील बालाजी वॉर्डात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची वस्ती आहे. येथे काही महिला दररोज शहरात फिरून कचरा गोळा करण्याचे काम करतात. त्याचवेळी त्यांना दाराला कुलूप असल्याचे दिसून येते. घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याची संधी हेरून घरफोडी करण्याचा सपाटा लावला. आरोपी महिलांनी चोरी केल्याची कबुली पोलीस कोठडी दरम्यान दिली. त्यावेळी तब्बल विविध सात ठिकाणी घरफोडी केल्याचे पोलिसांना सांगितले.
विशेष म्हणजे आरोपी महिलांनी कोणालाही चोरीचा सुगावा लागू नये म्हणून घराच्या भिंतीला मोठे छीद्र पाडून आत प्रवेश करण्याचे धोरण अवलंबिले होते. घरफोडीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने पोलीस प्रशासन चक्रावले होते. त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून घरफोडी करणाऱ्या तीन महिलांना जेरबंद केले. याप्रकरणी आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक (गृह) जयचंद काठे, उपविभागीय अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या नेतृत्वात बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, उपनिरीक्षक विनोद बावणे, राजेश चंचुवार, दिवाकर पवार, संजय फेंदे, विलास निंबाळकर, कुमोद खनके, अनुप आस्टूनकर, अजय कटाईत यांच्या पथकाने केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Two lakh rupees of seven thieves seized in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.