अपघातात मोटरसायकल चालकासह दोन ठार
By Admin | Updated: October 11, 2014 23:02 IST2014-10-11T23:02:01+5:302014-10-11T23:02:01+5:30
विरूद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. ही घटना १० आॅक्टोबरच्या रात्री १० वाजताच्या सुमारास कोंढा फाट्याजवळ घडली.

अपघातात मोटरसायकल चालकासह दोन ठार
भद्रावती : विरूद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. ही घटना १० आॅक्टोबरच्या रात्री १० वाजताच्या सुमारास कोंढा फाट्याजवळ घडली. आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्याला घेराव करून नारेबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
१० आॅक्टोबरला रात्री १० वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील कोंढा फाट्याजवळ ट्रॅक्टर (एम.एच. ३४ एल. ७८२८) हे विरूद्ध दिशेने भद्रावतीकडे येत असताना याच रस्त्यावरून दुचाकी (एमएच ३४ ए.जी. ४४२८) चा चालक भिमा नथ्थू वडसकर (२०) आणि त्याच्यासोबत चिन्ना भिमा दांडेकर (१९) रा. हनुमान वॉर्ड वरोरा हे वरोऱ्याकडे जात असताना कोंढा फाट्याजवळ ट्रॅक्टरने धडक दिली. यात भिमाचा जागीच मृत्यू झाला, तर चिन्नाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडताच ट्रॅक्टर चालक घटना स्थळावरून पसार झाला. अपघातानंतर अज्ञात ट्रॅक्टर चालकाला अटक करा, या मागणीसाठी भद्रावती पोलीस ठाण्याला मृताच्या नातेवाईकासह काही नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. येथील पोलीस निवडणूक आणि प्रचार सभेमुळे व्यस्त असल्याने काही काळ पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र येथील एपीआय, ज्ञानेश्वर आव्हाड, एपीआय गजभिये यांच्यासह शिपायांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)