अपघातात दोन ठार
By Admin | Updated: April 14, 2017 00:45 IST2017-04-14T00:45:34+5:302017-04-14T00:45:34+5:30
सिंदेवाही तालुक्यातील सरडपार-सिंदेवाही मार्गावरील वळणावर ट्रक-दुचाकीमध्ये बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास धडक झाली.

अपघातात दोन ठार
एक गंभीर : ट्रक-दुचाकीची भीषण धडक
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील सरडपार-सिंदेवाही मार्गावरील वळणावर ट्रक-दुचाकीमध्ये बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास धडक झाली. या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला असून दुसरा जखमी व्यक्ती उपचारादरम्यान मरण पावला. तिसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
मृतांमध्ये नानाजी रामा मडावी (५५) व रवी दादाजी दडमल (२६) यांचा समावेश आहे. दुचाकीवरील तिसरा अनिल वसंता टेकाम (२७) या युवकाला गंभीर दुखापत होऊन हात व पाय गमावला आहे. रत्नापूर येथील नानाजी मडावी, रवी दडमल व अनिल टेकाम दुचाकीने विवाह संबंध जोडण्यासाठी चिटकी (मूरपार) येथे गेले होते. तेथून परत येताना दोन दुचाकीवर तिघे-तिघे निघाले. दोन्ही दुचाकी सरडपार-सिंदेवाही मार्गाने येत असताना पुढच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. ही धडक जोरदार असल्याने नानाजी मडावी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रवी दडमल व अनिल टेकाम गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना सिंदेवाही येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. जखमींना घेऊन जात असताना रात्री १० वाजताच्या सुमारास रवी दडमल या युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही मृतांच्या पार्थिवावर रत्नापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंदेवाही पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)