विजासन येथे तलावाच्या प्रकरणावरुन दोन गटात हाणामारी
By Admin | Updated: December 7, 2014 22:47 IST2014-12-07T22:47:32+5:302014-12-07T22:47:32+5:30
शहरातील विंजासन या भागातील तलावाच्या वादावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले. यात एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांवर चंद्रपूरच्या जिल्हा शासकीय

विजासन येथे तलावाच्या प्रकरणावरुन दोन गटात हाणामारी
भद्रावती : शहरातील विंजासन या भागातील तलावाच्या वादावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले. यात एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांवर चंद्रपूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीपैकी न्यायालयाने ११ पुरुष आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर पाच महिला व एक पुरुष आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली. पोलीस या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
विंजासन या भागातील सर्व्हे नं. २ या ५२ एकरामधील तलावाचा गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयात वाद सुरु आहे. हा तलाव एका गटाच्या मालकीचा असून दुसरा गट त्या तलावातून मच्छी व शिंगाड्याचे पिक घेत आहे. त्याकरिता दुसरा गट पहिला गटाला वार्षिक पाच हजार रुपये किराया देत आहे. असे असताना या तलावातील उत्पादनात आपणालासुद्धा मालक बनवावे, असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. या मागणीसाठी त्यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले. तेव्हापासून या दोन गटात द्वेष निर्माण झाला आहे. यावरुन आजपर्यंत चार वेळा दोन्ही गटात जबरदस्त हाणामाऱ्या झाल्या. न्यायालयाचा निकाल आपल्या विरोधात लागेल अशी दुसऱ्या गटाची खात्री झाल्याने त्यांनी पहिल्या गटावर काल शनिवारी रात्री ८ वाजता लाठीकाठी व चाकूने हल्ला केला. त्यात एका महिलेसह पाच जण जखमी झाले. या सर्वांना चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सर्वांच्या प्रकृती धोक्याबाहेर आहे. यातील १७ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. या सर्व प्रकरणाचा तपास परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी फसके करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)