मनपा आमसभा : इतिवृत्तावरून पुन्हा खडाजंगीचंद्रपूर : मागील सभेतील इतिवृत्त वाचून दाखविणे व त्यातील त्रुट्या दुरुस्त करण्यावरून आजच्या आमसभेत दोन माजी स्थायी समिती सभापतींमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. अचानक बाचाबाचीवरून प्रकरण वाढत जात असल्याचे पाहून काही नगरसेवकांनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटविला. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये बुधवारी दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. राष्ट्रगीतानंतर मागील सभेचे इतीवृत्त वाचण्याची सभेत पध्दत आहे. इतीवृत्त वाचत असताना सभापतींच्या वाहन भत्त्याचा विषय समोर आला. यावर नगरसेवक गजानन गावंडे यांनी काही त्रुट्या दाखविल्या. त्यानंतर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नंदू नागरकर यांनीही यात काही दुरुस्त्या सुचविल्या. वाहन भत्त्यासाठी नगरसेवक, पदाधिकारी, महापौर व आयुक्तांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी नंदू नागरकर यांनी केली. याबाबत ते महापौर राखी कंचर्लावार यांच्याशी बोलत असताना मनपाचे माजी स्थायी समिती सभापती रामू तिवारी हे सभेत मोठ्याने ओरडत गोंधळ घालू नका, असे म्हणत मधे आले. यावरून नागरकर आणि तिवारी यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. दोघांमधील भांडण वाढत असल्याचे पाहून माजी उपमहापौर संदीप आवारी, अनिल फुलझेले, आकाश साखरकर व काही नगरसेवक यांनी मध्यस्थी करीत दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळानंतर प्रकरण शांत झाले व इतर विषयांवर चर्चा सुरू झाली.आजच्या आमसभेत शासनाच्या अमृत अभियानांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. या अमृत अभियानासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला जाणार आहे. यासोबतच गृहकरात झालेली वाढ या विषयही चर्चेत आला. झोन क्रमांक १ मधील नागरिकांना गृहकर वाढवून आले आहे. याबाबत नगरसेवक प्रशांत दानव, नंदू नागरकर, सुनिता लोढिया आदींनी सभागृहात जाब विचारला. पूर्वीच्या मालमत्ता करापेक्षा चौपट दराने मालमत्ता कराचे निर्धारण करण्यात आले आहे. ही वाढ अव्वाच्या सव्वा आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे जुन्या मालमत्ता कराच्या जास्तीत जास्त १० टक्के वाढ करून निर्धारण करावे, अशी मागणी दानव, नागरकर व काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. या विषयावरही सभेत चांगलाच गोंधळ झाला. त्यानंतर गुंठेवारी प्रकरणाबाबतची चर्चा करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)मागील सभेचे इतिवृत्त वाचताना नेहमीच हयगय केली जाते. सत्ताधारी इतर नगरसेवकांना बोलूच देत नाहीत. त्यामुळे एखाद्या विषयातील त्रुट्या कायम राहतात. याबाबतच आपण महापौरांना जाब विचारला. मात्र तिवारी यांनी मध्ये पडून अकारण वाद घातला.- नंदू नागरकर, माजी सभापती, स्थायी समिती मनपा, चंद्रपूर.महापौर यांच्याकडे जाब विचारताना नंदू नागरकर यांनी सभागृहात मोठ्या आवाजात भांडण्याच्या सुरात ओरडणे सुरू केले. त्यामुळे सभागृहात गोंधळ घालू नका, भांडण करायचेच असेल तर सभागृहाबाहेर जाऊन करा, असे आपण म्हणालो. -रामू तिवारी,माजी सभापती, स्थायी समिती मनपा चंद्रपूर.तीर्थरुपनगरात फुलणार बगिचाशास्त्रीनगर प्रभागातील तीर्थरुपनगरात १० हजार २०० चौरस मीटर जागा शाळेसाठी आरक्षित आहे. मात्र या नगरात शाळेची गरज नाही. त्यामुळे या जागेचे आरक्षण बदलवून येथे आझाद बागेसारखा बगिचा तयार केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल, याबाबत माजी उपमहापौर संदीप आवारी यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ही मागणी त्यांनी चार महिन्यांपासून रेटून धरली होती. अखेर आजच्या सभेत तिर्थरुप नगरात बगिचा तयार करण्यास मंजुरी देण्यात आली.पाणी पुरवठ्याबाबत पुन्हा तक्रारीशहरातील पाणी पुरवठा अजूनही अनियमित होत आहे. मागील सभेत यावर नगरसेवकांनी संताप व्यक्त केला होता. पाणी पुरवठा कंत्राटदाराला नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र पाणी पुरवठ्यात सुधारणा नाही. नागरिकांची ओरड सुरू असल्याचे नगरसेवक प्रशांत दानव यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे अमृत अभियानांतर्गत पाणी पुरवठा योजनेचा सुधारित आराखडा तयार करून मनपाने तो शासनाकडे पाठवावा, असे दानव यांनी सूचविले.
दोन माजी सभापतींमध्ये घमासान
By admin | Updated: October 29, 2015 01:33 IST