जिल्हाभरात आज एक लाख ७१ हजार ६३७ चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:07+5:302021-02-05T07:40:07+5:30
पोलिओ अथवा पोलिओमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओच्या उपसर्गाच्या ९० टक्के घटनांमध्ये ...

जिल्हाभरात आज एक लाख ७१ हजार ६३७ चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे
पोलिओ अथवा पोलिओमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओच्या उपसर्गाच्या ९० टक्के घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत; परंतु विषाणूने रक्तप्रवाहात प्रवेश केल्यास पोलिओ रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १ टक्क्यापेक्षा कमी रुग्णांच्या बाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करतो. शरीरातील स्नायूंच्या हालचालींना कारणीभूत असणाऱ्या ‘गतिप्रेरक न्यूरॉनना’ अपाय करतो. परिणामी, स्नायू दुर्बल व शेवटी पक्षाघाता होतो, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली. त्यामुळे बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी
अनेक वर्षांपासून पोलिओ मोहीम सुरू आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातही रविवारी एक लाख ७१ हजार ६३७ बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला दोन लाख ४६ हजार डोस प्राप्त झाले. दरम्यान, सर्व माता व पालकांनी आपल्या बाळाला न चुकता पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, चंद्रपूर शहर मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी केले आहे.
...असे मिळाले पोलिओ डोस
आरोग्य उपसंचालक, नागपूर कार्यालयातून जि.प. आरोग्य विभागाच्या व्हॅक्सिन व्हॅनने दोन लाख ४६ हजार पोलिओ डोस जिल्ह्याला प्राप्त झाले. हे डोस व्हॅक्सिन व्हॅननेच सर्व २ हजार ५५६ केंद्रांना वितरण करण्यात आले.
कोट
रविवारी ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना २ हजार ५२२ हजार केंद्रांवर पोलिओ डोस पाजण्यासाठी आराेग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. शिवाय, जिल्ह्यातील फ्रन्टलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू आहे. आपल्या बालकांना पोलिओ लस देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी चंद्रपूर