गुजरातचे दोन ठकबाज पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: May 7, 2015 00:57 IST2015-05-07T00:57:13+5:302015-05-07T00:57:13+5:30
उच्च शिक्षणासाठी व व्यवसायासाठी आॅनलाईन कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा भूलथापा देणाऱ्या जाहिरातीला बळी पडून येथील एका महिलेने ‘त्या’ ठकबाजांशी संपर्क साधला.

गुजरातचे दोन ठकबाज पोलिसांच्या ताब्यात
भद्रावती : उच्च शिक्षणासाठी व व्यवसायासाठी आॅनलाईन कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा भूलथापा देणाऱ्या जाहिरातीला बळी पडून येथील एका महिलेने ‘त्या’ ठकबाजांशी संपर्क साधला. त्या महिलेला ९९ हजार रूपयांनी गंडविल्याची घटना २४ एप्रिलला घडली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुजरातच्या दोन ठकबाजांना बुधवारी अटक केली.
हिरेनकुमार हरेशभाई राजगोट (२४) रा. गामबेदडा ता. मांडवी जि. कच्छ (गुजरात) व हितेत वसंतलाल राजगोट (३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एका वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीमध्ये आॅनलाईन लोन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे कळवून त्यावर आपला मोबाईल नंबर या ठकबाजांनी टाकला होता. लोनसाठी आयुध निर्माणी येथील सुमती रमेश शेट्टी (४५) या महिलेने त्यांच्याशी संपर्क केला. २० लाख रूपयांचे लोन देण्यात येईल असे महिलेला सांगण्यात आले. महिलेने आपला बँक खाते नंबर, इमेल आयडी, पत्ता इत्यादी माहिती आॅनलाईन दिली. त्यावेळी आपणास लोन मंजूर झाल्याचे सांगून अर्ज फी, इन्शुरन्स, चेक क्लीयरन्स, डीडी काढण्याकरिता व साक्षीदार मिळविण्याकरिता असे एकूण ९९ हजार रूपये या ठकबाजांनी वेगळ्या खात्यात जमा करण्याकरिता महिलेला सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून महिलेने रक्कम जमा केली. त्यानंतर लोनची २० लाख रूपयाची रक्कम आपल्या बचत खात्यात जमा व्हावी, यासाठी महिलेने ठकबाजांना फोनद्वारे कळविले. परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत होते. या सर्व प्रकारावरुन आपली फसगत झाल्याचे महिलेला समजल्याने महिलेने भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली.
ठाणेदार अशोक साखरकर यांनी खाते नंबर कुठले आहे, याचा शोध लावला. तेव्हा गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील मांडवी येथील खाते असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे एक विशेष पथक तयार करुन गुजरातला पाठविण्यात आले. माडवी येथील बँक गाठून खाते नंबर कोणाचे आहे, याबाबत माहिती काढली असता हिरेनकुमार राजगोळ याचे खाते निघाले. त्यांचा मोबाईल नंबर घेवून टावर लोकेशनच्या माध्यमातून आरोपी हिरेनकुमार राजगोट याला अटक केली. त्याने आपला बहिन जावई हितेत वसंतलाल राजगोट याच्या सांगण्यावरुन हा प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितले. दोन्ही आरोपीला भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, नऊ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (शहर प्रतिनिधी)