सलग दोन दिवस वाघाचा जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST2021-04-15T04:27:09+5:302021-04-15T04:27:09+5:30
नागभीड : तळोधी वनपरिक्षेत्रात मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचत आहे. मंगळवारी वाघाने मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला ...

सलग दोन दिवस वाघाचा जीवघेणा हल्ला
नागभीड : तळोधी वनपरिक्षेत्रात मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचत आहे. मंगळवारी वाघाने मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला करून ठार केल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच बुधवारी वाघाने आणखी एका व्यक्तीवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या घटनांनी तळोधी वनपरिक्षेत्रात दहशत निर्माण झाली आहे. बुधवारी वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश पुंडलिक गुरुनुले (५०) रा. गिरगाव असे असून तो सकाळी शेतानजीकच्या जंगलात (कक्ष क्रमांक ५३५ मध्ये) सिंद आणण्यासाठी गेला होता. तो सिंद कापण्याच्या कामात व्यस्त असताना वाघाने त्याच्यावर हल्ला केला. हा हल्ला सुरू असताना दुसरे दोन शेतकरी मोटारसायकलने जात होते. मोटारसायकलच्या आवाजाने हल्लेखोर वाघ पळून गेला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी लागलीच सुरेशला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, नंतर त्याला चंद्रपूरला हलविण्यात आले.
उल्लेखनीय बाब ही की, मंगळवारीच मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या विक्राबाई पांडुरंग खोब्रागडे या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली होती. ही घटना कचेपार बिटातील धामणगाव चक जंगलात घडली होती. या घटनेने वनविभागात अगोदरच खळबळ उडाली असताना बुधवारी ही घटना घडली. गिरगाव आणि धामणगाव चक या दोन घटनास्थळातील अंतर चार ते पाच किमीचे असून हल्लेखोर वाघ एकच असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे. उल्लेखनीय बाब ही की, सव्वा ते दीड महिन्यापूर्वी याच परिसरात सरपणासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले होते.