आझाद बागेतून मनपाची दोन कोटींची बचत
By Admin | Updated: March 17, 2016 01:09 IST2016-03-17T01:09:28+5:302016-03-17T01:09:28+5:30
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या आझाद बगिचाचा आता चेहरामोहराच बदलणार आहे. आझाद बागेचा विकास व देखभाल ...

आझाद बागेतून मनपाची दोन कोटींची बचत
चंद्रपूर : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या आझाद बगिचाचा आता चेहरामोहराच बदलणार आहे. आझाद बागेचा विकास व देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देण्यासाठी दुसऱ्यांदा प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्यावेळी एक, दुसऱ्यांदा दोन तर तिसऱ्या वेळी तीन निविदा मनपाकडे आल्या. यात सर्वात कमी म्हणजे पाच कोटी ६२ लाख १९ हजार ३३ रुपयांची निविदा प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनीची आहे. सात वर्षांसाठी हे कंत्राट असून यातून मनपाची दोन कोटींची बचत होणार आहे.
प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनीनंतर विजय आर. घाटे कन्स्ट्रक्शन अॅण्ड कॉन्ट्राक्टर यांची निविदा दुसऱ्या क्रमांकावर होती. ती सहा कोटी ८२ लाख २७ हजार ४४३ रुपयांची होती तर तिसऱ्या क्रमांकावर सात कोटी दोन लाख ६७ हजार ३२१ रुपयांची खलतकर कन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा आहे. २६ जून २०१५ ला स्थायी समितीच्या सभेत पारित झालेल्या प्रस्तावात आझाद बागेचा विकास तथा देखभाल दुरुस्तीसाठी महानगरपालिकेने ४ कोटी ९० लाखांच्या मर्यादेत निविदा मागविल्या. यात महेंद्र कन्स्ट्रक्शनने ६.१५ टक्के कमी तर विजय आर. घाटे कन्स्ट्रक्शन अॅण्ड कॉन्ट्रक्टरने ६.०१ टक्के कमीची निविदा पाठविली. मात्र पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीसाठी दोन्ही कंपनीने अनुक्रमे दोन कोटी ८५ लाख ९९ हजार ८४० रुपये व दोन कोटी ९९ लाख ९९ हजार ९२७ रुपयांची निविदा होती. याची एकूण रक्कम सात कोटी रुपये होत होती. यामुळे मनपा पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. माजी सभापती नंदू नागरकर यांनी या निविदेवर आक्षेप घेत ही निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा मागविण्याची मागणी केली. यानंतर या विषयावरून मनपा पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद रंगला. त्यानंतर मनपाचे स्थायी समिती सभापती संतोष लहामगे यांनी एक अभ्यास समिती गठीत केली. समितीच्या अहवालानंतर सदर निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली.
यात एकूण तीन निविदा आल्या. यात प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनीची पाच कोटी ६२ लाख १९ हजार ३३ रुपयांची निविदा सर्वात कमी आहे. ही निविदा आधीच्या तुलनेत दोन कोटीने कमी आहे. यामुळे महानगरपालिकेचीही दोन कोटीची बचत होणार आहे. यात कंत्राटी कंपनीला पहिल्या दोन वर्षात आझाद बागेचा विकास व सात वर्षासाठी बागेची देखभाल दुरुस्ती करायची आहे.
या संदर्भात मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी सांगितले की मनपाचा उद्देश केवळ खर्च करणेच नाही तर आझाद बगिचा विकसित करणे व सात वर्षांपर्यंत बागेचे सौंदर्य अबाधित ठेवणे आहे. स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी महापालिकेतर्फे पैशाची बचत करून अधिकाधिक विकास व्हावा, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)