भिवकुंडच्या सैनिकी शाळेसाठी १२ कोटींची आवारभिंत
By Admin | Updated: May 14, 2017 00:39 IST2017-05-14T00:39:47+5:302017-05-14T00:39:47+5:30
बल्लारपूर तालुक्याच्या विसापूर गावाच्या हद्दीतील भिवकुंड परिसरात राज्यातील दुसरी सैनिकी शाळा साकारणार आहे.

भिवकुंडच्या सैनिकी शाळेसाठी १२ कोटींची आवारभिंत
सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नाची फलश्रुती : जिल्ह्यात साकारणार राज्यातील दुसरी सैनिकी शाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्याच्या विसापूर गावाच्या हद्दीतील भिवकुंड परिसरात राज्यातील दुसरी सैनिकी शाळा साकारणार आहे. यासाठी महसूल प्रशासनाने १२२ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.
येथील नवीन सैनिकी शाळेच्या परिसरात आवारभिंत बांधकामासाठी १२ कोटी ३६ लाख ७७ हजार रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न कारणीभूत असून त्यांच्या प्रयत्नाची फलश्रुती झाली आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सलग प्रयत्नरत राहून केंद्र सरकारकडे येथील सैनिकी शाळेसाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र, गोवा व गुजरात क्षेत्राचे तत्कालीन लेफ्टनंट जनरल आर.आर. निंबोलकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली होती. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांना योग्य अहवाल सादर करून नियोजित जागा सैनिकी शाळेसाठी पुरेशी असल्याचे सांगीतले. याबाबत ना. मुनगंटीवार यांनी विधानसभेत आग्रही भूमिका मांडून प्रस्ताव पारित केला.
तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी पत्रव्यवहार करून सबळ पाठपुरावा केला. विधानसभेने मंजूर केलेल्या ठरावाला केंद्र सरकारने तत्वता कायम केल्याने सातारा येथील सैनिकी शाळेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात राज्यातील दुसरी सैनिकी शाळा निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारसोबत सामजस्य करार केला असून अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद केली आहे.