आधारस्तंभ वाकल्याने पूल कोसळण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: April 17, 2015 01:07 IST2015-04-17T01:07:21+5:302015-04-17T01:07:21+5:30
महाराष्ट्र व पूर्वीचा आंध्रप्रदेश मात्र सध्याचा तेलंगाणा राज्य सीमेवरून वाहणाऱ्या वर्धा नदीवर पूल बांधकामाकरिता

आधारस्तंभ वाकल्याने पूल कोसळण्याच्या मार्गावर
वाहतुकीस धोकादायक : कोट्यवधीच्या पोळसा पुलाला भ्रष्टाचाराचे ग्रहण
गोंडपिपरी : महाराष्ट्र व पूर्वीचा आंध्रप्रदेश मात्र सध्याचा तेलंगाणा राज्य सीमेवरून वाहणाऱ्या वर्धा नदीवर पूल बांधकामाकरिता स्थानिक माजी आमदार, खासदार, मंत्री महोदयांनी अहोरात्र मेहनत घेत पूल बांधकामास मंजुरी व निधी प्राप्त करून दिला. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांनी या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार केल्याने कोट्यवधीच्या पोळसा पुलाचा नववा आधारस्तंभ वाकला आहे. परिणामी पूल कोसळण्याच्या मार्गावर असून जड वाहतुकीस असमर्थ ठरत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
महाराष्ट्र व तेलंगना राज्याच्या सीमा जोडून दळणवळणातून नागरिकांना सुविधा, वाहनधारकांना कमी अंतर गाठून पोहचणे शक्य व व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून उत्तम सुविधा देण्याच्या हेतुने जिल्ह्याचे माजी खासदार नरेश पुगलिया, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर यांनी सतत पाठपुरावा करून शासनस्तरावरुन पोळसा-व्यंकटपूर सीमा जोडणारा वर्धा नदी पूल बांधकामाला मंजुरी मिळवून दिली. यासाठी राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोट्यवधींचा निधी देखील बांधकामास दिला.
निविदा प्रणालीतून सदर पूल बांधकामाचे कंत्राट नागपूर येथील कंपनीला मिळाले होते. तर गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे बांधकाम देखरेखीची पूर्ण जबाबदारी होती. मात्र येथील तत्कालीन उपअभियंता व विद्यमान उपअभियंता एस.सी.तव्वर व शाखा अभियंता अमरशेट्टीवार यांनी कमीशनच्या आकसापोटी कंत्राटदारांशी हात मिळवणी करून पूल बांधकाम स्थळी हजर न राहता कंत्राटदाराला रान मोकळे करून दिले. त्यामुळे कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य, माती मिश्रीत रेती व गिट्टीचा वापर करून पूलाचे फाऊंडेशन (पायवा) बांधकाम केल्याने अवघ्या दोन ते तीन वर्षातच कामाचे पितळ उघडे पडले आहे. पूलचा नववा आधारास्तंभ वाकल्याने पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे.
या पूलावरुन सद्यस्थितीत जड वाहतूक बंद असून जडवाहनधारक पूल ओलांडण्यास घाबरत आहे. शासनाच्या कोट्यवधींच्या खर्चातून तयार झालेला पूल निकृष्ट दर्जाच्या कामाने नव्हे तर अल्पवृष्टीत सात ते आठ दिवस पुरात बुडल्याने ही अवस्था झाल्याचे म्हणत सा.बां. विभागाचे अभियंता काढता पाय घेत असल्याचीही माहिती आहे.
निकृष्ट दर्जाचे बांधकाम व भ्रष्टाचाराच्या ग्रहणामुळे क्षतीग्रस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या पोळसा पूलाला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले. तर माजी आ. अॅड. वामनराव चटप यांनी गोंडपिपरीतील काही ज्येष्ठ नागरिकांना पूलावरुन पायदळी चालवून संकल्प पदयात्रेचा डंकाही पिटला होता. मात्र आज घडीला पूलाची असलेली स्थिती पाहून लोकप्रतिनिधींच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. (तालुका प्रतिनिधी)
जबाबदारी काढली
वरिष्ठ स्तरावर माहिती पोहचली असता सा.बां. उपविभाग गोंडपिपरीचे चंद्रपूर येथील विभागीय कार्यालय-२ यांच्या नियंत्रणाखाली तयार झालेल्या सदर पूलाची जबाबदारी काढून सा.बा. विभाग-१ कडे सोपविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.
संगनमताने गिट्टीची विक्री
वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या पूल बांधकामादरम्यान जोडमार्ग नुतनीकरणाच्या वेळी जुन्या जोडरस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यावेळेस शेकडो ब्रास गिट्टी व दगड उत्खननातून बाहेर पडले. सदर साहित्य शासन जमा करायचे असताना उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता व लगतच्या गावातील एका राजकीय पुढारी कम ठेकेदाराने संगनमत करून परप्रांतात कमी भावात गिट्टीची विक्री केल्याचे तेथील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
जोडमार्ग बांधकामात अधिकाऱ्यांची ‘पार्टनरशिप’
पूल बांधकामानंतर पुलापासून गावापर्यंत पलीकडच्या काठावर बांधण्यात आलेल्या जोड मार्गाचे कंत्राट एका कंत्राटदाराचे नावे घेण्यात आले. त्यानंतर गिट्टी विक्रीतील सहकारी राजकीय पुढारी कम ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता यांनी ‘पार्टनरशिप’ करून निकृष्ट दर्जाचा रस्ता बांधल्याची ओरड आता नागरिकांमध्ये सुरू आहे.