दीड महिन्यापासून पाणी पुरवठा बंद
By Admin | Updated: September 30, 2014 23:35 IST2014-09-30T23:35:04+5:302014-09-30T23:35:04+5:30
कोरपना तालुक्यातील भोयगाव-जैतापूर एकोडी या गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना गेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

दीड महिन्यापासून पाणी पुरवठा बंद
लखमापूर : कोरपना तालुक्यातील भोयगाव-जैतापूर एकोडी या गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना गेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सदर गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जात होता. याचे मुख्य केंद्र गडचांदूर-भोयगाव मार्गावरील कवठाळा येथे आहे. या योजनेद्वारे १७ गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित पाणी पाणी पुरवठ्याचा सामना या गावांना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
१० वर्षापूर्वी या गावांसाठी सदर पाणी पुरवठा योजना सुरु केल्यानंतर सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाणी पुरवठा झाला व पाणीटंचाई रोखता आली. मात्र त्यानंतर आजतागायत पाईपलाईन, दुरुस्ती, पाईपलाईन विस्तार व गावातील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या योजनेचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे नसली तरी ग्रामपंचायतीला कर भरावा लागत आहे. मात्र संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक हलबल झाले आहे.
या गावातील महिला गावातील सार्वजनिक बोअरवेल, विहिरीतून काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा उपसा करीत आहेत. परंतु पाण्याचा साठा मुबलक नसल्याने तासन्तास पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर कुठे एकाच बोअरवेलवर गावातील सर्वच महिला पाण्यासाठी गोळा होत असल्याने तंटे वाढत आहेत. गावातील बोअरवेलही मोळकळीस आल्या आहेत. सदर गाव मुख्य मार्गावर असल्याने व लोकसंख्या बघता पाण्याचा साठा मुबलक असणे गरजेचे आहे. मात्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. (वार्ताहर)