लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सध्या हलक्या तुरीची तोडणी व मळणी सुरू झाली आहे. तर अधिक मुदतीच्या तुरी फुलोरा अवस्थेत आहेत. शेतकऱ्यांच्या पदरात हलक्या तुरी पडण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. अशातच काही दिवसांपूर्वी खुल्या बाजारात तुरीचे दर ११ हजार रुपयांवर गेलेले होते. मात्र, हेच दर आता घसरलेले आहेत. ७ हजार ५५० रुपये हमीभाव असला तरी जिल्ह्यात खुल्या बाजारात सध्या तुरीला ६ ते ७ हजार रुपयांचा दर आहे. सध्या क्विंटलमागे दोन ते तीन हजार रुपये व्यापाऱ्यांनी घटविलेले आहेत.
जेव्हा बाजारात तुरीची आवक असते, तेव्हा व्यापाऱ्यांकडून दर पाडले जातात. शेतकऱ्यांकडील तूर संपताच पुन्हा दर वाढविला जातो. याचा फायदा व्यापाऱ्यांकडे साठवणूक केलेल्या मालालाच होतो. पर्यायाने व्यापाऱ्यांचाच फायदा होतो. मात्र जेव्हा शेतकऱ्यांचा शेतमाल निघतो तेव्हा बाजारभाव कमी होते. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
भाव आणखी पडणार?
- जिल्ह्यात अजूनपर्यंत तुरीची पाहिजे तशी आवक सुरू झालेली नाही. काही दिवसांतच तुरीची आवक सुरू होईल.
- बाजारात जेव्हा आवक सुरू होईल, तेव्हा भाव पडणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विकण्यासाठी घाई न करता भाव वाढीची प्रतिक्षा करावी.
कीड, रोगांमुळे उत्पादन घटणार? जिल्ह्याच्या विविध भागांत मागील काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण होते. या वातावरणामुळे तूर पिकाच्या मोहरावर विपरीत परिणाम झाला. मोहर जळाला तसेच पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. अशा वातावरणामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
आवक सध्या कमीच जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात तूर उत्पादन घेतात. तुरीची लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यांत करतात. सध्या जिल्ह्यातील कृषर्षी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक होत असली तरी ती कमी आहे. काही दिवसांत तुरीची आवक वाढेल, असा विश्वास व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.