तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात लागले अभियंत्याचे लग्न
By Admin | Updated: February 8, 2016 01:14 IST2016-02-08T01:14:21+5:302016-02-08T01:14:21+5:30
भद्रावती तालुक्यातील घोनाड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा पार पडला.

तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात लागले अभियंत्याचे लग्न
आदर्श विवाह : घोनाड येथे पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम
पिपरी (देशमुख) : भद्रावती तालुक्यातील घोनाड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा पार पडला. दरवर्षीची परंपरा कायम ठेवत याहीवर्षी विवाह सोहळा पार पडला विशेष म्हणजे या सोहळ्यात पेशाने अभियंता असलेले ज्ञानेश्वर नथ्थु विधाते यांचा विवाह त्याच गावातील पांडुरंग मत्ते यांची कन्या गायत्री हिचेसोबत पार पडला.
ज्ञानेश्वर विधाते हे चिमूर येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागात अभियंता म्हणून कार्यरत आहेत, तर वधू गायत्री ही बी.ई. (इलेक्ट्रॉनिक) ला दुसऱ्या वर्षाला साई इंजिनियरिंग लोणारा (घोडपेठ) येथे शिक्षण घेत आहे. या उच्चशिक्षित दाम्पत्याने अगदी साध्या पद्धतीने विवाह करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
आजकलच्या लग्नामध्ये डी.जे., बॅन्ड, महागड्या गाड्यावर नवरदेवाची वरात नेणे, खूप नाचणे असे प्रकार चालतात. मात्र ज्ञानेश्वरच्या वरातीत भजन मंडळ होते. भजनाच्या सुरात त्याची वरात मंडपात आणण्यात आली. नवरदेवाने खादीची बंगाली, खादीचे धोतर व भगवी टोपी परिधान केली होती तर वधूने नववारी पातळ परिधान केले होते. ग्रामगीता प्रणित आदर्श विवाह सोहळा या अध्यायातील मंगलाष्टके म्हणून विवाहाची सुरूवात करण्यात आली. यावेळी अक्षतांसाठी धान्याचा वापर न करता सर्व उपस्थित गुरुदेव कार्यकर्ते व पंचक्रोशीतील जमलेले जवळपास पाच हजाराच्या वर स्त्री-पुरूषांना फुलांचे वाटप करण्यात आले. लग्न मंगलाष्टके पूर्ण होताच उपस्थितांनी वधुवरांवर फुलांचा वर्षाव केला.
त्यानंतर जळगाव येथील राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. गुलाबराव महाराज यांनी काल्याचे कीर्तन केले. उपस्थितांनी रांगेत जाऊन वधुवरांना आशिर्वाद दिला.
यावेळी कोणीही भेटवस्तू सोबत आणली नव्हती. कोणीही भेटवस्तू आणू नये, असे आवाहन गुरूदेव सेवा मंडळाने केले होते. सदर विवाह हा संपूर्णपणे हुंडामुक्त व अनाठाई खर्च टाळणारा होता. जेवणाची व्यवस्था गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पंगतीमध्ये पाहुण्यांना बसवून केली.
जेवणावळी उठल्यानंतर पत्रावळी एका ट्रॅक्टरमध्ये भरून दुसऱ्या दिवशी जाळण्यात आल्या.
घोनाड गावात तुकाराम दादा गीताचार्य ग्रामनिधी कोष स्थापन आहे. गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येकी १० हजार रुपये जमा करून गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याला अडचण आली, तर त्याला आर्थिक सहाय्य करतात. शिक्षण, आजार, नैसर्गिक आपत्ती व ग्रामनिधी कोषामधून गावातील अडचणी गावातच भागविल्या जातात.
गुरुदेव सेवा मंडळाकडून येणाऱ्या संपुर्ण पाहुण्यांची दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंगमध्येच व्यवस्था करण्यात आली होती. लग्नाच्या मंचावर सर्व भूवैकुंठ आत्मानुसंधान टेकडी (अड्याळ) येथील लक्ष्मणराव नारखेडे दादा यांच्या उपस्थितीत वधू-वर व त्यांच्याच बाजूला आईवडील बसलेले होते. यावेळी नारखेडे दादांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
वधू-वरांच्या उपस्थितीत मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. त्यामध्ये वैद्य गुरुजी, माजी आमदार वामनराव चटप, सुनील कुमार, सेवकराम मिलमिले, प्रा. देठे, डॉ. जगन्नाथ गावंडे, नामदेव काळे, डॉ. ठाकरे, आस्वले गुरुजी, देवराव ठावरी सर्व प्रचारक यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक पंढरीनाथ खोडे यांनी केले. दोन दिवसीय कार्यक्रमाच्या भोजनाची व्यवस्था रामदास वाघारे यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील पुरुष, महिला बचत गट, न्यायमंडळ, संरक्षण दल, गाव तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत सदस्य, क्रीडा मंडळ, सेवासह संस्था यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण आवारी, नंदकिशोर शेळकी यांनी तर आभार काळे यांनी मानले. (वार्ताहर)