जिल्ह्यात क्षयरोगाचे रुग्ण वाढतीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:16+5:302021-03-24T04:26:16+5:30

चंद्रपूर : जीवाणूजन्य आजार असलेल्या क्षयरोगाचे २०२५ पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचे प्रयत्न शासनाकडून करण्यात येत असले, तरी जिल्ह्यात या ...

Tuberculosis patients are on the rise in the district | जिल्ह्यात क्षयरोगाचे रुग्ण वाढतीवरच

जिल्ह्यात क्षयरोगाचे रुग्ण वाढतीवरच

चंद्रपूर : जीवाणूजन्य आजार असलेल्या क्षयरोगाचे २०२५ पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचे प्रयत्न शासनाकडून करण्यात येत असले, तरी जिल्ह्यात या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षात जिल्ह्यात खासगी व सरकारी रुग्णालयात दोन हजार ६६२ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५०८ रुग्ण उपचाराअंती बरे झाले. ७१६ जणांचे उपचार पूर्ण झाला आहेत, तर ११८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. योग्य निदान आणि उपचार घेतल्यास या आजारातून बचाव करता येतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार मायक्रो बॅक्टेरिअम टुबरक्युलोसिस नावाच्या जंतूमुळे होणारा आजार आहे. त्याचा संसर्ग हवेतून क्षयरुग्णांच्या खोकल्याद्वारे, शिंकल्याद्वारे होण्याची शक्यता असते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने व नियमित उपचार घेतल्याने या आजारातून आपला बचाव करता येऊ शकतो. २०२५ पर्यंत या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा क्षयरोग विभाग प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी सरकारी रुग्णालयातर्फे जनजागृती करण्यात येत असून, उपचार करण्यात येतो. चंद्रपूर जिल्ह्यात सन २०२० मध्ये दोन हजार ६६२ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी १,५५७ रुग्ण सरकारी तर १,१०५ रुग्णांची खासगी रुग्णालयात नोंद करण्यात आली. त्यापैकी ७१६ जणांनी आपला उपचार पूर्ण केला. त्यापैकी ५०८ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४२ जणांचे एमडीआर निदान करण्यात आले, तसेच ११८ जणांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित उपचार घेतल्यास क्षयरोगाचे आपण उच्चाटन करू शकू, असा विश्वास वैज्ञकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बॉक्स

आजाराची लक्षणे

क्षयरोग हा शरीराच्या कोणत्याही अवयवावर होऊ शकतो. अवयवाप्रमाणे लक्षणे आढळून येत असतात. साधारणत: दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला असणे, कोरडा खोकला येणे, ताप येणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे, छातीत दुखणे, थकवा येणे आदी प्रकरची लक्षणे दिसून येतात.

बॉक्स

अशी घ्या काळजी

तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण करणे, अर्धवट उपचार घेतल्यास एमडीआर टीबी होण्याची शक्यता असते. खोकताना तोंडावर हात ठेवावा किंवा रुमालाचा वापर करावा, थुंकी एका मटक्यात माती टाकून जमा करावी, आहार व्यवस्थित घ्यावा, जेवणात अंडी, फळे, मांस, मच्छीचा समावेश असावा. प्रोटीन पावडर खावी.

कोट

Web Title: Tuberculosis patients are on the rise in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.