टिकणारी प्रेमभावना हाच खरा पुरस्कार - मुनगंटीवार
By Admin | Updated: January 17, 2016 00:50 IST2016-01-17T00:50:02+5:302016-01-17T00:50:02+5:30
सत्ता कधीच चिरकालीन नसते. ती येते आणि जातेही. मात्र सत्तेनंतरही समाजमनात टिकून असणारे व्यक्तीबद्दलचे प्रेम हाच खरा पुरस्कार असतो,

टिकणारी प्रेमभावना हाच खरा पुरस्कार - मुनगंटीवार
लोकसेवा विकास संस्थेचे पुरस्कार प्रदान : निर्मला सामंत, मामूलकर, देवतळे सन्मानित
चंद्रपूर : सत्ता कधीच चिरकालीन नसते. ती येते आणि जातेही. मात्र सत्तेनंतरही समाजमनात टिकून असणारे व्यक्तीबद्दलचे प्रेम हाच खरा पुरस्कार असतो, असे प्रतिपादन वित्त तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित लोकसेवा आणि विकास संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कार समारंभात ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्र्रीय अर्थराज्यमंत्री तथा लोकसेवा आणि विकास संस्थेचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे होते. मंचावर संस्थेचे सचिव प्रशांत पोटदुखे, प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, रमेश मामीडवार, शफीक अहमद यांच्यासह सत्कारमूर्ती माजी मंत्री संजय देवतळे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष निर्मला सामंत प्रभावळकर उपस्थित होते. निमंत्रित आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने खचाखच भरलेल्या या सभागृहात समारंभादरम्यान वक्त्यांच्या भाषणाने कौटुंबिक वातावरणाचा अनुभव आला.
निखळ संवादाने समारंभ रंगला
हा पुरस्कार वितरण समारंभ निखळ संवादाने रंगला. प्रभाकरराव मामुलकर प्रकृती बरी नसतानाही हाताला लावलेल्या सलाईनच्या बँडेजसह उपस्थित होते. ते म्हणाले, पोटदुखे हे आपले ज्येष्ठ बंधु आहेत, त्यामुळे हा पुरस्कार टाळणे शक्य नव्हते. आपण आणि ते दोघेही संस्थाचालक आणि राजकीय क्षेत्रात असतानाही कधीच प्रतिस्पर्धी म्हणून न बघणे आणि प्रसंगी स्रेहाचा हात पुढे करणे हे त्यांचे वैशिष्ठ जाणवले. ना. मुनगंटीवार म्हणाले, पक्षकार्य आणि राजकारण करतानाही शांतारामजींनी पारिवारिक भावना सतत जोपासली. आपण त्यांच्याविरूद्ध निवडणूक लढवूनही त्यांनी मनात कटुता कधीच ठेवली नाही. उलट ते खासदार झाल्यावर आपण एकदा दिल्लीत असताना त्यांनी गाडी पाठवून स्वत:च्या घरी जेवायला बोलाविले. ना. मुनगंटीवारांच्या आमगनातील विलंबामुळे समारंभ उशिरा सुरू झाला. वक्तशिरपणाबद्दल ख्याती असलेल्या शांतारामजींनी आपल्या भाषणातून दखल घेतली. ते म्हणाले, आपण नियोजनमंत्री आहात. वेळेचेही नियोजन करा. त्यावर स्मीत करीत ना. मुनगंटीवारांनी सहमती दर्शविली.