स्वच्छ भारत निर्मितीचे खरे शिल्पकार रासेयो स्वयंसेवक: दीपक यावले
By Admin | Updated: December 30, 2016 01:33 IST2016-12-30T01:33:36+5:302016-12-30T01:33:36+5:30
ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना प्रभावीपणे करते. विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी रुजविल्या जाते

स्वच्छ भारत निर्मितीचे खरे शिल्पकार रासेयो स्वयंसेवक: दीपक यावले
चिमूर: ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना प्रभावीपणे करते. विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी रुजविल्या जाते. यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळते. विद्यार्थ्यांना ज्ञान व अनुभवामुळे प्रगतीची दिशा मिळते. तसेच गावकऱ्यांचे सहजीवन अनुभवायला मिळते. यामुळे स्वच्छ गावाचा विकास झाल्यास देशाचा विकास नक्कीच होईल. स्वच्छ भारत निर्मितीचे खरे शिल्पकार राष्ट्रीय सेवा योजनेच स्वयंसेवक आहेत, असे प्रतिपादन गांधी सेवा शिक्षण समिती चिमूरचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले यांनी केले.
चिमूर तालुक्यातील गोंदोडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूरच्या वतीने सात दिवसाचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ‘स्वच्छ भारत अभियान’ या संकल्पनेवर शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटन समारंभाप्रसंगी उद्घाटक म्हणून आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूरचे प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर तर प्रमुख वक्ते म्हणून गांधी सेवा शिक्षण समिती चिमूरचे सचिव प्रा. किशोर वैद्य, मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. अंथोनी, स्थानिक व्यवस्थापन परिषदेचे अनिलसिंह राजपुत, गोंदोडा गुंफा समितीचे सचिव चंद्रभान शेंडे, सरपंच राजेंद्र धारणे आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर यांनी राष्ट्रसंतांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच प्रा. किशोर वैद्य यांनी चिमूर क्रांती व तुकडोजी महाराजांचे कार्य सांगितले. डॉ. दीपक यावले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, गावात स्वच्छतेची मोहीम सुरु केल्यास आपल्याला प्रत्यक्ष अनुभव मिळते. ग्रामीण भागातील जनतेचे अंतरंग जाणून घेण्यासाठी आपल्याकडे संधी चालून आलेली आहे. यातून ग्रामीण विकासाला चालना मिळत असते. स्वच्छ भारत अभियान संकल्पनेवर शिबिर गावासाठी उपयोगाचे ठरणार आहे.
संचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. पितांबर पिसे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. दिनकर राऊत यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार प्रा. प्रफुल्ल राजुरवाडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)