ट्रक चालकाने दुचाकीस्वारास उडविले
By Admin | Updated: August 26, 2016 00:51 IST2016-08-26T00:51:00+5:302016-08-26T00:51:00+5:30
चंद्रपूरवरून भद्रावतीकडे जात असताना पतीपत्नीस्वार असलेल्या दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली.

ट्रक चालकाने दुचाकीस्वारास उडविले
चंद्रपुरातील घटना : पती जागीच ठार, पत्नी जखमी
चंद्रपूर : चंद्रपूरवरून भद्रावतीकडे जात असताना पतीपत्नीस्वार असलेल्या दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. सदर घटना गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील जकात नाक्याजवळील आंबेडकर सभागृहासमोर घडली.
भुजंगराव साळवे (६५) रा. सुमठाणा असे मृताचे नाव असून लिलाबाई साळवे (६०) या गंभीर जखमी आहेत. एका कार्यक्रमासाठी भुजंगराव साळवे हे पत्नीसोबत दुचाकीने चंद्रपूरला आले होते. सायंकाळच्या सुमारास ते सुमठाणा येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान जकात नाक्याजवळील आंबेडकर सभागृहासमोर दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसली. यात भुजंगराव साळवे हे जागीच ठार झाले. तर लिलाबाई साळवे यांचा पाय जमिनीला घासत गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करून नंतर एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले.
घटनेनंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी चालकाचा शोध घेवून त्याला अटक केली व एमएच ३४ एम ६४० क्रमांकाचा ट्रक जप्त केला. मृत भुजंगराव साळवे हे आयुधनिर्माणी येथील सेवानिवृत्त कर्मचारी होते. (स्थानिक प्रतिनिधी)