ट्रकने बालिकेला चिरडले, संतप्त नागरिकांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:24 IST2019-07-04T22:24:23+5:302019-07-04T22:24:42+5:30
नवेगाव मोरे बसस्थानकावर आईसोबत उभी असलेल्या श्रेया मंगेश मोरे (५) या बालिकेला गोंडपिंपरीकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. घटनेनंतर ट्रकचालक गाडीसह पसार झाला. संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

ट्रकने बालिकेला चिरडले, संतप्त नागरिकांचा रास्तारोको
लोकमत न्यूज नेटवर्क
घोसरी : नवेगाव मोरे बसस्थानकावर आईसोबत उभी असलेल्या श्रेया मंगेश मोरे (५) या बालिकेला गोंडपिंपरीकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. घटनेनंतर ट्रकचालक गाडीसह पसार झाला. संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
पोंभूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथील श्रेया मोरे ही बालिका आईसोबत हैदराबाद येथे कामाला गेलेल्या वडीलांना भेटण्यासाठी बसस्थानकात आली होती. तिथेच दोघेही उभे होते. दरम्यान, मूलवरून गोंडपिंपरीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र.एम.एच.३२ क्यू ३४११) श्रेयाला चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनचालक महेश भाऊजी नेवारे रा. मूल हा घटनास्थळावरून पसार झाला. सदर घटनेची माहिती नागरिकांना कळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी दीड तास रास्तारोको करून वाहतूक थांबवून ठेवली. वाहन मालकाला बोलविण्यात यावे, तेव्हाच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येईल, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांचा ताफाही लगेच घटनास्थळी दाखल झाला.
पोलिसांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोंभूर्णा पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल अटक केली. पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.