ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले
By Admin | Updated: September 28, 2015 01:11 IST2015-09-28T01:11:26+5:302015-09-28T01:11:26+5:30
सास्ती खाणीतून कोळसा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले
गोवरी : सास्ती खाणीतून कोळसा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेला इसम गंभीर जखमी झाल्याने त्याला राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा अपघात रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडला.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील सास्ती कोळसा खाणीतून कोळसा भरुन जाणाऱ्या एमएच-३४ एबी २२४ हा ट्रक भरधाव वेगाने पोवनी कोळसा खाणीत जाणाऱ्या दुचाकी एमएच-३४ यू- ६४५३ ला पोवनी फाट्यावरील चौरस्त्यावर जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील शेखचांद शेख अब्दुल (४८) रा. काटागेट बल्लारपूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेल्या संजु मिस्त्री रा. राजुरा यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघात घडताच संतप्त जमावाने राजुरा-गोवरी-कवडाळा मार्गावरील वाहतूक अडवून दोन तास रास्ता रोको केले. जोपर्यंत ट्रक चालकाला अटक व मृताच्या वारसांना आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा नातेवाईक व जमावाने घेतल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. (वार्ताहर)