शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली
By Admin | Updated: March 16, 2015 00:49 IST2015-03-16T00:49:08+5:302015-03-16T00:49:08+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वरोराच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर या पंचायत समितीअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या आहेत.

शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली
वरोरा: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वरोराच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर या पंचायत समितीअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या आहेत.
वरोरा पंचायत समितीअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्यांसह घरभाडे थकबाकी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. अनेक वेळा संबंधिताच्या भेटी घेतल्या. मात्र समस्या निकाली न निघाल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वरोराच्यावतीने ११ मार्चपासून वरोरा पंचायत समितीसमोर श्याम लेडे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरु करण्यात आले. १४ मार्चला आमदार बाळू धानोरकर तसेच जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, दत्ता बोरेकर, अविनाश ढेंगळे, राजू महाजन, बंडू लभाने, राजू लडके, पुरुषोत्तम निखाडे यांच्या उपस्थितीत संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी यांना उपोषण मंडपात बोलावून शिक्षकांच्या घरभाड्याची समस्या प्रत्यक्षपणे कार्यवाही करुन सोडवून घेतली. आमदार बाळू धानोरकर व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी यापुढे शिक्षकांच्या शासनदेय समस्या प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी तसेच ग्रामीण भागात विद्यार्जनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना अशा प्रकारे आंदोलन करण्याची गरज माझ्या क्षेत्रात निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.
जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी जि.प. स्तरावरुन वरोरा पं.स. करीता आर्थिक अडचण पडू देणार नाही, अशी हमी दिली. सदर आंदोलनात गजानन कहुरडे, अशोक टिपले, सुभाष कुंभारे, संजय आगलावे, भास्कर गाडगे, माणिक थुटे, अरुण देऊळकर, विजय बरडे, विद्याचरण गोलकर, सुनील बुरेले सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)