शिक्षकांच्या मागण्यांसाठी आता समस्या निवारण दरबार
By Admin | Updated: March 16, 2016 08:35 IST2016-03-16T08:35:34+5:302016-03-16T08:35:34+5:30
चंद्रपूर जिल्हा परिषदेंतर्गत विविध पंचायत समित्या त्याचप्रमाणे, जिल्हा परिषद यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या विविध समस्या आहेत.

शिक्षकांच्या मागण्यांसाठी आता समस्या निवारण दरबार
शिक्षण सभापतींचा पुढाकार : शिक्षकांशी साधला जाणार थेट संवाद
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेंतर्गत विविध पंचायत समित्या त्याचप्रमाणे, जिल्हा परिषद यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या विविध समस्या आहेत. त्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित असतात. या समस्यांचा लवकरात लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी पुढाकार घेऊन शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आता थेट समस्या निवारण दरबाराचे आयोजन करणार आहेत.
समस्या निवारण दरबारामुळे समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक, सहायक शिक्षक यांच्या विविध समस्या, मागण्या, प्रश्न, सूचना आहेत. या बाबी दीर्घकाळ प्रलंबित असतात. या बाबींकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांच्याकडे १६ फेब्रुवारीच्या सभेत लक्ष वेधले होते. त्यावर तत्काळ निर्णय घेत प्रत्येक पंचायत समितीमध्ये समस्या निवारण दरबार आयोजित करून थेट शिक्षकांशी संवाद साधण्याचे शिक्षण सभापतींनी ठरविले.
त्यानुषंगाने पहिला शिक्षण समस्या दरबार २१ मार्चला सोमवारी दुपारी १२ वाजता पंचायत समिती चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी व पंचायत समिती चंद्रपूर मधील शिक्षक संवर्गातील सर्वांची उपस्थिती यावेळी राहणार आहे. समस्या निवारण दरबारचे नियोजन चार टप्यात करण्यात आले असून पहिल्या टप्यात शिक्षक संवर्गातील सर्वांना समस्या निवारण दरबारचे सूचनापत्र देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात समस्या संकलन करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात समस्यांचे संकलन व कार्यवाही होणार असून चौथा टप्पा २१ मार्चला दुपारी १२ वाजता प्रत्यक्ष समस्या निवारण दरबारचे आयोजन करण्यात आलेले आहे. समस्या निवारण दरबारात वैयक्तिक समस्या, सामूहिक मागण्या त्याचप्रमाणे विविध प्रश्न व सूचना मांडण्यात येणार असल्यामुळे चंद्रपूर पंचायत समितीमधील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)