राष्ट्रीय ग्रामीण रोहयो अडचणीत
By Admin | Updated: March 20, 2016 00:54 IST2016-03-20T00:54:05+5:302016-03-20T00:54:05+5:30
ग्रामीण भागातील मजुरांसाठी कामधेनू ठरु पाहणारी रोजगार हमी योजना अडचणीत सापडली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण रोहयो अडचणीत
नागभीड : ग्रामीण भागातील मजुरांसाठी कामधेनू ठरु पाहणारी रोजगार हमी योजना अडचणीत सापडली आहे. केंद्र शासनाकडून या योजनेस पुरेसा निधीच प्राप्त होत नसल्याने या योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. या योजनेच्या नागपूर येथील एका कार्यालयाने कुशल देयकांचे प्रदान बंद करणयच्या सुचनाच निर्गमित केल्या आहेत.
२ आॅक्टोबर २००६ रोजी देशात या योजनेचा शुभारंभ झाला. तेव्हापासून ही योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ लागल्याने कामाच्या शोधात शहरांकडे वळू पाहणारा लोंढा काही अंशी कमी झाला. या योजनेच्या माध्यगमातून ग्रामीण भागातील अनेक कामे तडीस निघाली. यात मातीकाम, शेत रस्ते, तलाव खोलीकरण आदी विविध कामांचा यात समावेश आहे.
या योजनेत ६० टक्के रक्कम अकुशल आणि ४० टक्के रक्कम कुशल मजुरीवर खर्च करण्याचे प्रावधानआहे. असे असले तरी कुशल देयकांचे प्रदान बंद करण्यात आल्याने या योजनेंतर्गत अनेक कामे थांबण्याची शक्यता आहे. सध्या मार्च महिण्याचा दुसरा पंधरवाडा सुरू असून ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण करावयाची असतात. कुशल कामाच्या देयकाचे प्रदानच बंद करण्यात आल्याने या कामांची गती आता निश्चितच मंदावणार आहे.
दरम्यान, या योजनेच्या नागपूर येथील आयुक्त यांच्या कार्यालयाने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठविलेल्या एका पत्रातून कळविले आहे की १० मार्च २०१६ पासून कुशल रकमांची प्रदाने केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होईपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. (तालुका प्रतिनिधी)