आदिवासी विद्यार्थीही घेणार ई-लर्निंगचे धडे
By Admin | Updated: September 10, 2016 00:45 IST2016-09-10T00:45:21+5:302016-09-10T00:45:21+5:30
संपूर्ण जग विज्ञानाच्या युगात वावरत असताना जिवती तालुक्यातील दुर्गम भागात मात्र अद्यापही या सुविधा पोहचल्या नाहीत.

आदिवासी विद्यार्थीही घेणार ई-लर्निंगचे धडे
पालक आनंदी : पेसा अंतर्गत तालुक्यात ई-लर्निंगची पहिल्यांदाच सुरुवात
जिवती : संपूर्ण जग विज्ञानाच्या युगात वावरत असताना जिवती तालुक्यातील दुर्गम भागात मात्र अद्यापही या सुविधा पोहचल्या नाहीत. ई- लर्निंग म्हणजे नेमके काय, हेच येथील आदिवासी कुटुंबांना माहित नाही. मात्र आता पहिल्यांदाच दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थीही ई-लर्निंगचे धडे गिरविणार आहेत.
शासन अनेक शाळात ई-लर्निंग सुविधा प्राप्त करुन देत आहे. यामध्ये विशेषकरुन शहरी शाळाचा अधिक समावेश दिसतो. मात्र दुर्गम भागातील शाळांमध्ये काही कारणास्तव यासारख्या सुविधा अजूनही पोहचल्या नाहीत. असाच अतिदुर्गम भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याची ओळख आहे. हा तालुका पेसा अंतर्गत येत असून आता येथील नऊ शाळांत ई - लर्निंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. तालुक्याची शिक्षणाची स्थिती पाहता, आजच्या घडीला शिक्षणच महत्वाचे असून पेसा अंतर्गत निधीचा वापर आपण ई- लर्निंग यावर खर्च करायचा, असे ठरवून संवर्ग विकास अधिकारी एस. जे. बागडे यांनी याकडे विशेष लक्ष दिले. शहरातील मुलांना मिळणारी सुविधा ही तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याचे ठरवून गेल्या आठवड्यात त्यांनी नऊ शाळेत ही सुविधा सुरु केली आहे. यात पाटण, टेकामांडवा, भोक्सापूर, चिखली खुर्द, मरकागोंदी, राहपल्ली खुर्द, गडशेला, भारी आणि पुनागुडा या शाळांचा समावेश आहे.
ई-लर्निंग म्हणजे काय हेच येथील विद्यार्थ्यांना माहित नव्हते. पण हेच विद्यार्थी आता ई-लर्निंगने धडे घेत असून विद्यार्थी स्वत: हा प्रोजेक्ट चालवत आहेत. एलईडी टीव्ही, संगणक, होम थिएटर बॉक्स आणि वर्ग १ ते १० साठीचा संपूर्ण अभ्यासक्रम असलेले साफ्टवेअर असे साहित्य आहेत.
या ई-लर्निंग प्रोजेक्टसाठी एका शाळेला जवळपास दीड ते दोन लाखांचा खर्च येणार असून शहरातील शाळांतील मिळणारी सुविधा आज जिवती तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मुलांनाही मिळत आहे, अशी माहिती विस्तार अधिकारी ए. एस. महाजनवार यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)
वर्षभरात सर्वच शाळा
ई-लर्निंग करणार
उच्च दर्जाचे शिक्षण दुर्गम भागात उपलब्ध करुन देणे, मानव विकास निर्देशांकात वाढ करणे, हे हेतू साध्य करायचे असून जिवती तालुक्यातील सर्वच शाळा येत्या वर्षभरात ई-लर्निंगयुक्त करु, असा मानस संवर्ग विकास अधिकारी एस.जे. बागडे यांनी व्यक्त केला.