आदिवासी कुटुंबाची जमीन हडपली

By Admin | Updated: September 1, 2016 01:27 IST2016-09-01T01:27:55+5:302016-09-01T01:27:55+5:30

येथील चंद्रभान धोंडू जुमनाके या आदिवासी कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Tribal family's land grabbed | आदिवासी कुटुंबाची जमीन हडपली

आदिवासी कुटुंबाची जमीन हडपली

बनावट दस्तऐवजांचा वापर : घोडपेठ तलाठी कार्यालयाचा प्रताप
घोडपेठ : येथील चंद्रभान धोंडू जुमनाके या आदिवासी कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
स्वत:ची हक्काची जमीन परत मिळविण्यासाठी या आदिवासी शेतकऱ्याची शासनदरबारी पायपीट सुरू आहे. मात्र, या प्रकरणाने घोडपेठ येथील तलाठी कार्यालयातील कामकाजाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्येही आपल्या शेतजमिनीच्या कागदपत्रांसंदर्भात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
घोडपेठ येथील आदिवासी महिला गुजी राघो जुमनाके यांची घोडपेठ येथे भुमापन क्र. २२५/ब, आराजी १ हेक्टर ४३ आर एवढी वडिलोपार्जित शेतजमीन होती. गुजी जुमनाके यांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काने त्यांच्या दोन मुलांचा सातबारा उताऱ्यावर फेरफार घेण्यात आला होता.
गुजी राघो जुमनाके यांचे वारसदार धोंडू जुमनाके व चिरकुटा जुमनाके यांचा मृत्यू अनुक्रमे २१ मार्च २००२ तसेच ३ डिसेंबर २०११ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काने या शेतजमिनीवर धोंडू व चिरकुटा यांच्या वारसदारांच्या नावाचा फेरफार करणे घोडपेठ येथील तलाठी कार्यालयाकडून अपेक्षित होते.
मात्र, दोन महिन्यांपूर्वी चंद्रभान धोंडू जुमनाके यांनी घोडपेठ येथील तलाठी कार्यालयातून सदर शेतजमिनीचा गाव नमुना सात घेतला असता या शेतजमिनीवर भोगवटदार म्हणून बबिता बाळू कांबळे रा. घुग्घुस यांचे नाव असल्याचे निदर्शनास आले.
तसेच गुजी राघो जुमनाके यांच्या काळात ही शेतजमीन भोगवटदार वर्ग २ मध्ये होती, मात्र सध्या ही जमीन भोगवटदार वर्ग १ मध्ये केल्याचे कागदपत्रांवरून लक्षात येत आहे.
बनावट कागदपत्रे तयार करून आदिवासी असलेल्या जुमनाके परिवाराची जमीन हडप करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रभान धोंडू जुमनाके यांनी या प्रकरणाची रितसर तक्रार तहसीलदार तसेच भद्रावती पोलिसात केली. तहसीलदारांनी या प्रकरणी लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच आपली वडिलोपार्जित व हक्काची शेतजमीन परत करावी, अशी मागणी घोडपेठ चंद्रभान जुमनाके यांनी केली आहे. (वार्ताहर)

माहिती दिली नाही
बनावट कागदपत्रे वापरून आपली शेतजमीन हडप केल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रभान जुमनाके यांनी या शेतजमिनीवर गुजी जुमनाके यांचे नाव असताना बबिता बाळू कांबळे यांचे नाव कशाच्या आधारे चढविण्यात आले व कोणत्या वर्षी चढविण्यात आले, याची माहिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार भद्रावती यांना माहितीच्या अधिकारात मागितली. मात्र, मागितलेली माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपाची असल्याने माहिती पुरवता येत नाही, असे लेखी उत्तर नायब तहसीलदारांनी दिले.

Web Title: Tribal family's land grabbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.