A tree is the eternal life | वटवृक्ष म्हणजे शाश्वत मिळणारा प्राणवायू
वटवृक्ष म्हणजे शाश्वत मिळणारा प्राणवायू

ठळक मुद्देअंजली घोटेकर : महानगरपालिकेचा १००० वटवृक्ष लागवडीचा सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय समाजजीवनात वटवृक्षाला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे, आज सिमेंटची जंगले सातत्याने वाढत असताना जगण्यापुरता आॅक्सिजन आपणास मिळणे आवश्यक असल्याने एक तरी झाड प्रत्येकाने लावावे हा संकल्प सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ, मूल व चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक हजार वटवृक्ष लागवडीचा सोहळा १९ आॅगस्ट रोजी कर्मवीर कन्नमवार प्राथमिक शाळा येथे सकाळी १० वाजता पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
वटवृक्षांची लागवड करण्याची चांगली कल्पना अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली असता त्यांनी ती तात्काळ मान्य केली. वृक्षसंवर्धनासोबतच कागद व कापड वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेकांना वृक्षलागवड करणे शक्य नसते, अशा व्यक्तींनी किमान परिसरातील आहेत त्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
यावेळी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे म्हणाले, यावर्षी जिल्ह्यामध्ये ११ हजार वटवृक्ष लावण्याची संकल्पना आहे. याला जिल्हाधिकारी, वनविभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांची साथ लाभते आहे, असेही ते म्हणाले.
९० टक्के उद्दिष्ट पूर्ण
जिल्हाधिकारी कुणाल खेमणार म्हणाले, ३३ कोटी वृक्ष लागवडीत आपल्या जिल्ह्याचा मोठा वाट आहे. एक कोटी ६७ लक्ष वृक्ष आपण लावतोय. ते वृक्ष लावण्याचे काम आता ९० टक्यांवर पोहचले आहे. वृक्षलागवडीसाठी तीन महिन्यांचा कालावधी असला तरी दीड महिन्यातच आपण ९० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. या व्यतिरिक्त वटवृक्ष लावण्याचे काम आपण हाती घेतले आहे. वटवृक्षाचे माहात्म्य वेगळे आहे, त्याचे आयुष्य व इतरांना आयुष्य देण्याची क्षमता अमर्याद आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.


Web Title: A tree is the eternal life
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.