‘आशा क्लिनिक’मुळे होऊ लागला रुग्णांवर गावातच उपचार
By Admin | Updated: August 24, 2015 01:16 IST2015-08-24T01:16:42+5:302015-08-24T01:16:42+5:30
अतिदुर्गम भागात हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ....

‘आशा क्लिनिक’मुळे होऊ लागला रुग्णांवर गावातच उपचार
आरोग्य विभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम : रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न
जिवती : अतिदुर्गम भागात हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिवतीचे संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडसीलवार यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘आशा क्लिनिक’ या योजनेचा पहिला प्रयोग पाटण आरोग्य केंद्रातील आंबेझरी गावात सुरू करण्यात आला. जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेच्या माध्यमातून गावातील आशा स्वयंसेविकांना खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण करणे. तसेच लोकसहभागातून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावतो, लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती व सुदृढ आरोग्य सेवेची गरज निर्माण करुन समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न या योजनेतून करण्यात येणार आहे.
पहाडावरील गरीब व गरजू व्यक्तींना एकाच छताखाली त्यांच्याच गावामध्ये प्राथमिक व किरकोळ स्वरूपाच्या आरोग्य सेवा आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून कमीत कमी दरात रुग्णास उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ५० टक्के उत्पदनाच्या माध्यमातून लोकांना आरोग्य सेवा पुरविणे व उर्वरित ५० टक्के उत्पन्नातून स्वयंसेविकेस मानधन स्वरूपात रोजगार मिळवून देण्यासाठी ‘आशा क्लिनीक’ या नाविन्यपूर्ण योजनेची संकल्पना तयार करण्यात आली आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आशा क्लिनिकची स्थापना करण्यात येणार असून यासाठी लागणारी साधन सामुग्री ही ग्रामपंचायतीमधून पुरवठा केली जाणार आहे. त्यात गावपातळीवर आशा क्लिनिक समिती गठीत करणे व ठिकठिकाणी आरोग्य सेवासत्र भरविण्याची जबाबदारी गावातील आशा स्वयंसेविकेवर सोपविण्यात आली.
या योजनेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिवती तालुका हा अतिदुर्गम भागात असल्याने येथील दळणवळणाच्या व आरोग्याच्या सोयी सुविधा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. यासाठी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आंबेझरी गावात आशा क्लिनिक ही योजना प्रायोजिक तत्वावर केली. रुग्णांना गावातच उपचार मिळणार आहे. येथील जनतेचा प्रतिसाद पाहता तालुक्यातील प्रत्येक गावातच या योजनेचा शुभारंभ करण्याचा मानस आहे.
- संदीप गोडसेलवार
संवर्ग विकास अधिकारी, जिवती