ताडाळी टोलनाका बंदीमुळे प्रवाशांत आनंद
By Admin | Updated: March 29, 2015 01:15 IST2015-03-29T01:15:37+5:302015-03-29T01:15:37+5:30
चंद्रपूर-भद्रावती महामार्गावरील मागील दोन दशकांपासून सुरू असलेला ताडाळी येथील टोलनाका न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आल्यामुळे ...

ताडाळी टोलनाका बंदीमुळे प्रवाशांत आनंद
घोडपेठ : चंद्रपूर-भद्रावती महामार्गावरील मागील दोन दशकांपासून सुरू असलेला ताडाळी येथील टोलनाका न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांसोबतच खासगी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांतही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
ताडाळी व ऊर्जाग्राम येथील प्रत्येकी एक व चंद्रपूर शहरातील दोन उड्डाणपुलांची टोलवसुली ताडाळी येथील टोलनाक्यावरून सुरु होती. ३२ कोटी रुपये खर्चून हे चार रेल्वे उड्डाणपुल बांधण्यात आले होते. मात्र बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेल्या या टोलनाक्याची वसुली पुर्ण झाली नसल्याचे कारण पुढे करून प्रत्येक वेळी या टोलनाक्याची मुदत वाढविण्यात येत होती. २०२७ पर्यंत या टोलनाक्यावरून वसुलीची मुदत देण्यात आली होती. मात्र विधान परिषद सदस्या शोभाताई फडणविस यांनी स्वत: टोलनाक्याला भेट देवून पाहणी केली. या भेटीदरम्यान नाक्यावरील कर्मचारी बोगस पावत्या प्रवाशांना वितरित करीत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. २० टक्के संगणकीय पावत्या व उरलेल्या छापिल बोगस पावत्या वाहनधारकांना सर्रास वितरीत केल्या जात होत्या. या साऱ्या प्रकाराला आ.फडणवीस यांनी प्रखर विरोध केला.
मुंबईस्थित सहकार ग्लोबल लिमी. या कंपनीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताडाळी टोलनाका रद्द करण्याच्या आदेशाबद्दल न्यायालयात अपील करून १ डिसेंबर २०१४ ला स्थगिती आणली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका खारीज करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना जो आर्थिक भुर्दंड बसत होता त्याला लगाम लागला आहे. (वार्ताहर)