सागवानाची तस्करी करणारे जाळ्यात

By Admin | Updated: November 6, 2014 22:51 IST2014-11-06T22:51:54+5:302014-11-06T22:51:54+5:30

मानिकगड पहाडावरील जिवती वन परिक्षेत्रास लागून असलेल्या आंध्र प्रदेशातील डोंगरगाव (चिचपल्ली बिट) येथे सागवन झाडाची तोड करुन त्याची वाहतूक महाराष्ट्र वन विभागाच्या कोलांडी, नंदप्पा मार्गे

Traps of smuggling smugglers | सागवानाची तस्करी करणारे जाळ्यात

सागवानाची तस्करी करणारे जाळ्यात

नऊ जणांना अटक : अपघातामुळे उघडकीस आली तस्करी
राजुरा : मानिकगड पहाडावरील जिवती वन परिक्षेत्रास लागून असलेल्या आंध्र प्रदेशातील डोंगरगाव (चिचपल्ली बिट) येथे सागवन झाडाची तोड करुन त्याची वाहतूक महाराष्ट्र वन विभागाच्या कोलांडी, नंदप्पा मार्गे कागजनगरला मेटॅडोरद्वारा करीत असताना अचानक कोलांडी जवळील वळणावर मेटॅडोरला उलटला. या अपघातामुळे सागवानाची तस्करी उजेडात आली. मेटॅडोरमधून सागवानाची लाकडे बाहेर आल्याने वनविभागाने तात्काळ कारवाई करीत सागवान तस्करांना ताब्यात घेतले.
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव (आं.ध्र.) हे गाव आंध्र प्रदेश वन विभागाच्या आसिफाबाद रेंज, वाकडी उपपरिक्षेत्र व चिचपल्ली नियत बिटात येते. तेथील मुख्य तस्कर बाबू इंगडे हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी भिमराव जयतू मडावी रा. डोंगरगाव याची वन कोठडी घेण्यात आली आहे. वाहन मालक विठ्ठल किसन आडे व चालक बाबाराव दगडू पवार रा.जिवती याने आपल्या मेटॅडोरमध्ये (क्र. एमएच-३१ एपी- १९८२) सागवान लाकूड भरण्यासाठी डोंगरगाव येथे नेले. तेथे अगोदर कटाई करुन ठेवलेले ५१ साग नग मेटॅडोरमध्ये डोंगरगाव येथील सोनेराव महादू कुमराम, भिमराव जमतू मडावी, जयतू मारु टेकाम, मोतीराम जयतू मडावी, पोलीगा रामू आत्राम, भिमराव आनंदा आत्राम व संतोष रामा थोरात यांनी १७ आॅक्टोबर २०१४ ला भरुन दिले. माल भरलेले वाहन कागजनगरकडे जाण्यासाठी महाराष्ट्राच्या कोलांडी, नंदप्पा, भारी मार्ग निघाले असताना अचानक कोलांडी नंदप्पा वन कक्ष क्र. १०४ दरम्यानच्या वळणावर मेटॅडोर उलटला. त्यामुळेच सागवान तस्करीचा प्रकार उघडकीस आला.
मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सहाय्यक वनसंरक्षक आर. एस. धोतरे यांना चौकशीसाठी पाठविण्यात आले. जिवती वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी डी.आर. अडकीने, क्षेत्र सहाय्यक पी.एच. भसारकर, विरुर वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी अशोक मेडपल्लीवार, वनरक्षक देरकर, कराडे, अलोणे, एन. आर. देशकर, क्षे.प्र. सहाय्यक पी.एम. सुरजागडे, डी.एम. रामटेके, वन बन्दुकधारी सिद्धार्थ कांबडे, एन. ए. नरगेवार, आय.एम. शेख यांनी फरार असलेले वाहन चालक व मालकास अटक केली. त्यानंतर ४ नोव्हेंबरला डोंगरगाव येथे जाऊन धाड टाकून झाडे तोडणाऱ्या व भरणाऱ्या अशा सात लोकांना अटक केली. मुख्य सूत्रधार बाबू इंगडे फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी भिमराव मडावी याला वनकोठडीत ठेवण्यात आले आहे. तपासणी करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना अद्याप कटाईचे हत्यार, माल नेण्याचे निश्चित स्थळ व यापूर्वी किती माल नेला याचा शोध लागलेला नाही. आंध्र प्रदेशच्या वन हद्दीतील झाडाची तोड करुन महामार्गाने तस्करी करणाऱ्यावर या कारवाईमुळे लगाम लागेल, असे म्हटले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Traps of smuggling smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.