हल्लेखोर बिबट अडकला पिंजऱ्यात

By Admin | Updated: October 22, 2015 00:45 IST2015-10-22T00:45:35+5:302015-10-22T00:45:35+5:30

गेल्या काही दिवसांपासून खेडी गावात धुमाकूळ घालून २४ बकऱ्यांना ठार मारणारा बिबट अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात मंगळवारी ११ वाजताच्या दरम्यान अडकला.

Trapped hippocamping cage | हल्लेखोर बिबट अडकला पिंजऱ्यात

हल्लेखोर बिबट अडकला पिंजऱ्यात

सावली : गेल्या काही दिवसांपासून खेडी गावात धुमाकूळ घालून २४ बकऱ्यांना ठार मारणारा बिबट अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात मंगळवारी ११ वाजताच्या दरम्यान अडकला.
११ आॅक्टोबर रोजी खेडी येथील सुकरू बुका कंकलवार यांच्या बकऱ्याच्या गोठ्यात शिरून बिबट्याने २१ बकऱ्या ठार मारल्या. तर बंडु पोचू येरेवार यांची एक शेळी मारली. त्यानंतर १८ आॅक्टोबरला पुन्हा खेडी येथीलच गणेश रामा कंचलवार यांच्या गोठ्यातील दोन बकऱ्या ठार केल्या. तेव्हापासून पुढील अनर्थ होऊ नये म्हणून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चार पिंजरे लावले होते. त्यापैकी भवराळा गावाजवळील आसोला मेंढा नहरालगत असलेल्या पिंजऱ्यामध्ये सदर बिबट रात्री ११ वाजताच्या दरम्यान अडकला आणि गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बिबट्याच्या दहशतीत असलेल्या खेडी येथील मेंढपाळ कुटुंबीयांनी वनविभागाचे आभार मानले. अडीच ते तीन वर्षे वय असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. बकऱ्यांच्या मालकाला नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक बकरीचे तीन हजार रुपये देण्यात येणार असल्याचे सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी एम.पी. राठोड यांनी सांगितले.
सदर बिबट्याची रवानगी चंद्रपूरच्या रामबाग नर्सरीत करण्यात आली असून त्याची आरोग्य तपासणी करून योग्य ठिकाणी सोडण्यात येईल असे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी सांगितले. उपविभागीय वनाधिकारी एस.एस. पाटील व सहाय्यक वनसंरक्षक डब्ल्यू.व्ही. मोरे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक बी.डी. चिकाटे, एस.डी. येलकेवाड, विजय रामटेके, राजू कोडापे यांचेसह वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Trapped hippocamping cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.