्रजटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी पालकमंत्र्यांच्या रडारवर
By Admin | Updated: November 15, 2015 00:34 IST2015-11-15T00:34:12+5:302015-11-15T00:34:12+5:30
चंद्रपूरकरांसाठी नेहमीची डोकेदुखी असलेली जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...

्रजटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी पालकमंत्र्यांच्या रडारवर
गेट परिसरात झाली स्टँडिंग मिटिंग : अधिकारी-नागरिकांनी सुचविले उपाय, सादर केले प्रस्ताव
चंद्रपूर : चंद्रपूरकरांसाठी नेहमीची डोकेदुखी असलेली जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढकार घेत शनिवारी चक्क गेट परिसरातच नागरिक आणि अधिकाऱ्यांची स्टँडिंग मिटिंग घेतली. या बैठकीत नागरिकांचे प्रस्ताव ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक समिती गठित करण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर नागरिकांनी सुचविलेल्या आराखड्यानुसार पहाणी करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.
तीन महिन्यांपूर्वीच ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात ‘मेक इन चंद्रपूर’ अंतर्गत नागरिक-अधिकाऱ्यांची बैठक घेवून शहराच्या दृष्टीने उपाययोजना ऐकून घेतल्या होत्या. त्यानंतर शनिवारी चक्क जटपुरा गेट परिसरात रस्त्याच्या कडेला अधिकारी-नागरिकांची बैठक घेऊन तात्काळ मार्ग काढण्यासाठी पाऊल उचलले. जटपुरा गेटवर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी व वाहतूक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी अधिकारी व शहरातील नागरिकांची समिती गठीत करण्याचा निर्णय या स्टँडिंग बैठकीत जाहीर केला. बैठकीला आमदार नाना शामकुळे, राजुराचे आमदार संजय धोटे, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, महापालिका आयुक्त सुधीर शंभरकर यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.
जटपुरा गेटच्या खिडक्या तोडण्यासंदर्भात नागरिकांचे प्रस्ताव आले होते. त्यावर ना. मुनगंटीवार म्हणाले, जटपुरा गेट हा ऐतिहासिक वारसा असल्याने तो जपायला हवा. गेटला धक्काही न लावता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. जटपुरा गेटची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथील आॅर्कालॉजिकल डायरेक्टर आॅफ जनरल यांना येत्या पंधरा दिवसात चंद्रपुरात पाचारण केले जाईल. त्यांच्याकडून गेटची पहाणी करून दुरूस्तीच्या दृष्टीने आणि शहरात प्रवेश करावयाच्या मार्गावरील किल्ल्याची फुटकी भींत पाडून मार्ग मोठा करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. यासोबत शहरातील पुरातत्व विभागाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या वास्तूंची पहाणीही त्यांच्याकडून करून या सर्व वास्तूंचे जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
वाहतूक कोंडीसाठी उपाययोजना सुचविणाऱ्या नागरिकांसह तज्ज्ञ नागरिकांची समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गठित करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. जटपुरा गेटवरील वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी ही समिती उपाययोजना सुचवेल, नागरिकांच्या सर्व सूचनांचा समितीने विचार करावा असे त्यांनी सांगितले. पुरातत्त्व विभागाच्या प्रमुखांना येत्या सोमवारीच पत्र लिहून चंद्रपूर भेटीवर येण्याची विनंती करणारे पत्र लिहिण्याची सूचनाही त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना केली. शक्य झाल्यास पुरातत्त्व विभागाच्या मंत्र्यांनाही भेटीसाठी विनंती करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले.
बसस्थानक ते रामाळा तलाव हा नवीन मार्ग निर्माण करणे तसेच रामगनर मार्ग एकेरी करून या मार्गाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वरोरा नाका चौकातील उड्डाण पुलावरील एक मार्ग २६ जानेवारीनंतर सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीनंतर पालकमंत्री व अधिकाऱ्यांनी जटपुरा गेटची पाहणी केली. बैठकीस शहरातील नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)