सिग्नल बंदमुळे वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:35+5:302021-01-25T04:28:35+5:30
चंद्रपूर : शहरातील मिलन चौक तसेच इतर काही चौकांतील वाहतूक दिवे बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे ...

सिग्नल बंदमुळे वाहतूक विस्कळीत
चंद्रपूर : शहरातील मिलन चौक तसेच इतर काही चौकांतील वाहतूक दिवे बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गांधी चौकाकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने येथे नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्ह्यातील पाएंदरस्ते झाले निमुळते
चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या छोटा नागपूर, दाताळा, कोसारा, शिवनी, मार्डा परिसरातील पाणंद रस्ते अगदीच निमुळते झाले आहेत. विशेष म्हणजे, काही शेतकऱ्यांनी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कुंपण केल्यामुळे अन्य शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे कठीण झाले आहे. संबंधितांनी लक्ष देवून शेताकडे जाणारे रस्ते मोकळे करावे, अशी मागणी होत आहे.
बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. असे असतानाही काही किराणा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गोल बाजारातील बहुतांश दुकानदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
शिक्षकांच्या मेसेजमुळे पालकांत संताप
चंद्रपूर : अनेक शाळांत ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला आहे. मात्र, नियमित येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या मेसेजमुळे पालक वैतागले आहेत. शिक्षक मोबाईलवर मेसेज पाठवून मोकळे होत आहेत. शिक्षकांच्या मेसेजमुळे आता पालक वैतागले आहेत. मोबाईलचे काम असतानाच पाल्यांना मोबाईल द्यावा लागत आहे. विशेष म्हणजे, मोबाईल मुलाजवळ राहत असल्याने मुलांनाही आता कंटाळा आला आहे.
विरंगुळा केंद्र सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर नामफलकाशिवाय काहीच नसल्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे या केंदात सुविधा पुरवून केंद्र अद्ययावत करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
पडोली परिसरातील रस्ता दुभाजकाची दुरवस्था
चंद्रपूर : इरई नदी ते पडोली परिसरात असलेल्या रस्ता दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी झुडपे वाढले असून कडेला रेतीही साचली आहे. त्यामुळे या परिसरात अपघाताची शक्यता आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देवून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
नियमित लाईनमन नसल्याने त्रास
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावांत लाईमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
मास्क विक्रीतून रोजगार
चंद्रपूर : लॉकडाऊननंतर प्रशासनाने व्यवहार करण्यावर सूट दिल्यानंतर बाजारपेठ खुली झाली आहे. यामध्ये काही छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी मास्क विक्रीचा नवा व्यवसाय सुरू करून यातून रोजगार मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.