घुग्घुस-वणी मार्गावर वाहतुकीचा खोळंबा
By Admin | Updated: August 15, 2016 00:27 IST2016-08-15T00:27:43+5:302016-08-15T00:27:43+5:30
येथून कोळसा घेऊन ताडाळीकडे जाणाऱ्या मालवाहू रेल्वे गाडीच्या इंजिनचे वीज वाहिनीचे तार व इंजिनला जोडणारा पिंटो तुटला.

घुग्घुस-वणी मार्गावर वाहतुकीचा खोळंबा
दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा : वीज तार तुटल्याने रेल्वे मध्येच थांबली
घुग्घुस : येथून कोळसा घेऊन ताडाळीकडे जाणाऱ्या मालवाहू रेल्वे गाडीच्या इंजिनचे वीज वाहिनीचे तार व इंजिनला जोडणारा पिंटो तुटला. यामुळे घुग्घुस - वणी मार्गावरील राजीव रतन दवाखान्याजवळच्या रेल्वे गेटवरील वाहतूक ठप्प झाली. तब्बल चार तास घुग्घुस -वणी महामार्गावरील वाहतूक बंद असल्याने रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूनी दोन कि.मी. पर्यत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. हा प्रकार आज रविवारी सकाळी घडला.
आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घुग्घुसकडून ताडाळी रेल्वे मार्गाने कोळसा घेऊन जाणाऱ्या रेल्वे इंजिनचे रेल्वे हायटेंशन वीज वाहिनी आणि इंजिनला जोडणारा तार (पिंटो) चंद्रपूर- घुग्घुस- वणी महामार्गावरील राजीव रतन चौकातील रेल्वे गेटवर तुटला. त्यामुळे घुग्घुस- वणी महामार्गावरील वाहतूक थांबली. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेत तार (पिंटो) जोडण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र या कामाला साडेतीन तास लागले. दरम्यान वणी व चंद्रपूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी दोन कि.मी. पर्यत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना एक तास लागला. यामुळे अनेक रुग्णवाहिका व एसटी महामंडळाच्या एसट्यांना फटका बसला. या मार्गावरील सर्व बसेस चार तास लेट झाल्या.
या रेल्वे मार्गावर कोळसा व सिमेंट वाहतूक दिवसभर चालत असते. त्यामुळे वणी - घुग्घुस महामार्गावरील राजीव रतन चौकातील रेल्वे गेट अनेकदा बंद असते. नेहमीच वणी - चंद्रपूर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत असतात. मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत होण्याकरिता अर्धा तास वेळ जातो. एखादा गंभीर रुग्ण रुग्णवाहिकेत असला तर त्याच्या जीवही धोक्यात येतो. यासोबतच कामगार व शाळकरी मुलांना चांगलाच फटका बसत असून त्यांना कामावर, शाळेत वेळेवर पोहचता येत नाही.
चंद्रपूर- घुग्घुस-वणी मार्गावरील राजीव रतन रेल्वे गेट व घुग्घुस वस्तीच्या पोलीस ठाण्यानजीकच्या रेल्वे गेटवर उड्डाणपूल बांधण्याची मागणी सातत्याने शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे अनेक वर्षापासून केली जात आहे. मात्र या महत्वाच्या व गंभीर विषयाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. (वार्ताहर)