वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:48+5:302021-02-05T07:37:48+5:30
घुग्घुस : चंद्रपूर-घुग्घुस-वणी महामार्ग हा रात्रंदिवस मोठ्या वर्दळीचा आहे. या मार्गाला गावातून सर्व्हिस रोड नसल्याने व ...

वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा
घुग्घुस : चंद्रपूर-घुग्घुस-वणी महामार्ग हा रात्रंदिवस मोठ्या वर्दळीचा आहे. या मार्गाला गावातून सर्व्हिस रोड नसल्याने व मार्गावर हायवा ट्रकचालक जागोजागी पार्किंग करीत असल्याने आणि एकेरी वाहतुकीचे उल्लंघन होत असल्याने रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
चंद्रपूर-घुग्घुस-वणी या महामार्गावरून दिवसरात्र जड मालवाहू वाहनाबरोबरच चारचाकी, दुचाकी, ऑटो यासारख्या वाहनांची सातत्याने वर्दळ सुरू असते. वर्धा नदी, राजीव रतन चौक, छत्रपती शिवाजी चौक ते प्रियदर्शनी कन्या महाविद्यालयच्या समोर शेणगाव फाट्यापर्यत महामार्गाला सर्व्हिस रस्ता नाही. रस्त्यालगत व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी जड वाहने उभी राहत असल्याने, वाहतुकीस अडथडा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे, विविध ट्रान्स्पोर्टरचे कार्यालय, वर्कशॉप असल्याने वाहनचालक एकेरी वाहतुकीचे वाहतूक शिपायांसमोर उल्लंघन करीत असतात, तरी वाहतूक शिपाई त्यांना अभय देत आहेत. त्यामुळे नेहमी किरकोळ अपघात घडत आहे.
मागील १५ दिवसांपूर्वी वेकोलीच्या कामगार वसाहतकडे दुचाकी वाहनाने बापलेक घरी जात असताना, ट्रकने जबर धडक दिली. त्यात बापाचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर झाला होता. असे अपघात घडत आहे. अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनावर व एकेरी वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.