परंपरा जोपासणारी मंडळे

By Admin | Updated: September 8, 2016 00:45 IST2016-09-08T00:45:36+5:302016-09-08T00:45:36+5:30

अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या गणरायाची स्थापन करण्यात आली आहे.

Traditional traditions | परंपरा जोपासणारी मंडळे

परंपरा जोपासणारी मंडळे

पारंपारिक वारसा : ध्वनी प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्याचा संकल्प 
चंद्रपूर : अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या गणरायाची स्थापन करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना आजही काही मंडळांकडून जुन्या परंपरा जोपासल्या जात आहेत. यात बोटावर मोजण्याइतके मंडळे असली तरी या गणेश मंडळांनी ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करून समाज जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्याचे प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिसून आले.
चंद्रपूर येथील गोलबाजारातील एका चाळीत साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाला १०९ वर्षांची परंपरा आहे. ३१ आॅगस्ट १९०८ मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्याही आधीपासून येथे सार्वजनिक स्वरुपात गणेशाची स्थापना केली जाते. बालगोविंद पंडीत यांनी १९०८ मध्ये सर्वप्रथम येथे गणरायाची स्थापना केली होती. या ठिकाणी टेलरिंगची दुकाने आहेत. या दुकानांच्या चाळीतच गणरायाची स्थापना होते. या गणेशोत्सवासाठी तब्बल १० दिवस काही दुकाने स्वमर्जीने दुकानदार बंद ठेवतात. ही परंपरा आजही जोपासली जात आहे. भजन आणि भोजन हे या मंडळाचे ब्रिदच आहे. दहाही दिवस-रात्री या ठिकाणी भजन केले जाते. गोलबाजारातील दुकानदार रात्री भजनात सहभागी होतात. विशेष म्हणजे, या मंडळाने एक्का (अखंड टाळ) ही परंपरा आजही कायम ठेवली आहे.
यासोबत गणरायाचे विसर्जनही अतिशय साधे म्हणजे भजन-किर्तन गातच केले जाते. ढोलताशे, बॅण्ड संदल या वाद्यांना मंडळाने दूर ठेवले आहे. सौरभ गटलेवार हे या मंडळाचे अध्यक्ष असून संजय दिकोंडावार हे उपाध्यक्ष आहेत. तर प्रभाकर आक्केवार हे सचिव आहेत. या मंडळाने पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला साथ देत यावर्षी ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे.
गिरणार चौक येथील जय बजरंग गणेश मंडळालाही यावर्षी ५० वर्षांची परंपरा लाभली आहे. विशिष्ट अशा प्रकारचे मंदिर तयार करून गणरायाची स्थापना केली आहे. या मंडळाचे अध्यक्ष सुरेश अडपेवार असून सचिव रघुवीर अहीर हे आहेत. या मंडळाने समाजजागृती करणारे अनेक फलक लावले आहेत.
चंद्रपूरचा राजा म्हणून ओळख असलेल्या जटपुरा गणेशोत्सव मंडळालाही यावर्षी ४२ वर्षाची परंपरा लाभली आहे. आपल्या वेगळ्या वैशिष्टयामुळे जिल्ह्यात हे मंडळ प्रसिध्द असून दरवर्षी डेकोरेशन करताना देशातील विविध प्रसिध्द वास्तूंचे देखावे तयार केले जाते. यंदा मंडळाने हैद्राबाद येथील चारमिनारची प्रतिकृती तयार केली असून अक्षरधाम येथील मंदिराची प्रतिकृती तयार करून त्यामध्ये २५ फुटाच्या गणपतीची स्थापना केली आहे. या मंडळातर्फेही विविध उपक्रम राबविले जात असून यावर्षी प्रशासनाच्या आवाहनानुसार डीजे वाद्याला फाटा देत पारंपारिक वाद्य करून विर्सजन करण्याचा संकल्प या मंडळाने केला आहे.
चंद्रपुरातील सवारी बंगला येथील गणेश मंडळाने यावर्षी ११९ वर्षे पूर्ण केली आहेत. या मंडळातर्फे सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात. या मंडळानेही प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. तसेच चंद्रपुरातील टिळक बाजार गणेश मंडळ, राष्ट्रीय गणेश मंडळ, हिवरपुरी बाल गणेश मंडळ, टागोर गणेश मंडळानाही अनेक वर्षांची परंपरा असून सामाजिक जनजागृतीसाठी विविध देखावे सादर करण्यात ही मंडळे अव्वल आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

प्रशासनाच्या आवाहनला साथ
जिल्हा प्रशासनाने यावर्षी ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे. तसेच आवाहनही गणेश मंडळांना करून डीजे गणेश विर्सजन मिरवणुकीतून बाद करण्याचे निर्देश दिले आहे. या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला असून पारंपारिक वाद्य करून विर्सजन करण्याचा संकल्प गणेश मंडळांनी केला आहे. यात शेकडो गणेश मंडळांचा समावेश आहे.

बल्लारपूरच्या मंडळाचीही परंपरा कायम
जनजागृती आणि समाज व देशाच्या तत्कालीन घटना व समस्यांवर उत्तम देखावे सादर करण्यात बल्लारपूर येथील पेपर मिल कला मंदिराजवळील सार्वजनिक गणेश मंडळ अग्रस्थानी आहे. या मंडळाला जनजागृती कार्याचे पुरस्कार पोलीस विभागाकडून मिळाले आहेत. हे मंडळ पर्यावरण लोकशिक्षण यावर भर आहे. मागील वर्षी या मंडळाने पाणी बचाव, स्वच्छतेचे महत्व, स्त्री मुक्ती आणि समान हक्क या विषयांवर देखावे उभे करुन वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. बॅनरद्वारे वेगवेगळे संदेश अंकित केले होते.

Web Title: Traditional traditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.