गोवारी समाजातर्फे पारंपरिक गोवर्धन पूजा
By Admin | Updated: October 30, 2016 00:47 IST2016-10-30T00:47:39+5:302016-10-30T00:47:39+5:30
येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते.

गोवारी समाजातर्फे पारंपरिक गोवर्धन पूजा
ऐतिहासिक वारसा : यात्रा व नाटकाचेही आयोजन
वतन लोणे/यशवंत घुमे घोडपेठ
येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते. या गोवर्धन पूजेला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून आदिवासी गोवारी समाजातर्फे मोठ्या श्रध्देने व पारंपारिक पध्दतीने साजरी करण्यात येते.
परिसरातील चपराडा, चालबर्डी, घोट, निंबाळा, हेटी, लोणारा (गोंड), लोणारा (पारखी), कचराळा, चपराडा, मानोरा, मोहबाळा व ईतर अशा जवळपास १० ते १२ गावांमधील 'गो' पाल आपल्या गायी गोवर्धन पूजेसाठी याठिकाणी घेवून येतात. सुमारे चारशे वर्षांपेक्षाही जुनी असलेली परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने परिसरातील नागरिकांकडून जोपासण्यात येत आहे.
गोवर्धन पूजेच्या निमीत्ताने तालुक्यातील व्यापा-यांकडून येथे दुकाने लावली जातात. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप येते. तसेच मागील काही वर्षांपासून आयोजक समितीतर्फे रात्री नागरिकांसाठी नाटकाचे आयोजनही करण्यात येते.दिपावलीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतीपदेला गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरी गायींची पूजा केली जाते. त्यानंतर सार्वजनीक पूजेसाठी गायींना गोवर्धन पूजा पटांगणावर आणले जाते. या पटांगणावर साधारणत: पंचवीस ते तीस टोपले शेणापासुन एक मोठी भुरसी बनविण्यात येते. या भुरसीमध्ये एक अंडे व कोंबडीचे लहान जिवंत पिल्लू ठेवण्यात येते. पिलाचे धड शेणामध्ये दाबलेले असते व मानेचा भाग खुला ठेवण्यात येतो. तसेच अंदाजे एक फुटाच्या अकरा काड्यांचे अंडे व पिल्लाच्या सभोवती कुंपण करण्यात येते. या काड्या पाच प्रकारच्या झाडांच्या असतात. यावर गुलाबी रंगाची रिबीन गुंडाळून नारळाने भुरसीची ओटी भरण्यात येते. यावेळी लाकडी ढालींचे पूजन करण्यात येते. यानंतर गोवर्धन पुजेला सुरूवात होते. पूर्वी चारही गावांच्या सीमेची व शिवारामध्ये असलेल्या देवांची पूजा करण्यात येते. या पूजेला 'शिव बांधणे' असे म्हणतात. त्यानंतर पटांगणाशेजारी असलेल्या वाघोबाच्या मुतीर्ची व श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. पवित्र मंत्र म्हणून व नारळ फोडून भुरसीची पुजा करण्यात येते. नंतर पिल्लू व अंडे भुरसीबाहेर काढण्यात येते.
गुरांना वन्यप्राण्यांपासून त्रास होवू नये, गुरे रानात हरवू नयेत, गुरांना जादूटोणा होवू नये, त्यांचे रक्षण व्हावे, गुरांवर कोणतेही संकट येवू नये म्हणून फार पूवीर्पासून गायगोदन व पूजा करून देवाला प्रसन्न करतात. पूजा करतांना गायगोदनात कोंबडीचे पिल्लू व अंडे ठेवतात. त्यावर गायी खेळवितात. गायी खेळवितांना अंडे व पिल्लू यांना इजा झाली नाही व दोन्ही सुरक्षित राहिले तर गायगोदन साधला असे समजले जाते.
गोवारी समाजाचे आणि गोवर्धन पूजेचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी दरवर्षी बलिप्रतिपदेला या ऐतिहासीक पूजेचे आयोजन करण्यात येते. आपल्या पुर्वजांनीही गायीला मातेचा दर्जा दिला आहे. दरवर्षी आदिवासी गोवारी समाज गोमातेची मनोभावे पूजा करतो. सध्याच्या वेगवान युगात आपल्या जुन्या रूढी व परंपरा हरवत चालल्या आहेत. त्या परंपरा जपणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
- दिलीप राऊत
अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज