आधुनिक साधनांमुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

By Admin | Updated: May 3, 2015 01:37 IST2015-05-03T01:37:34+5:302015-05-03T01:37:34+5:30

प्रगत तंत्रज्ञानामुळे आधुनिक साधनांचा बदलत्या जीवनशैलीत वापर वाढत आहे.

Traditional business threats due to modern tools | आधुनिक साधनांमुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

आधुनिक साधनांमुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

चंद्रपूर : प्रगत तंत्रज्ञानामुळे आधुनिक साधनांचा बदलत्या जीवनशैलीत वापर वाढत आहे. यामुळे पारंपरिक साधनं मागे पडत असून सुतार, चांभार, कुंभार, लोहार या समाजाचा पारंपारिक व्यवसाय मोडकळीस आल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळते. पूर्वीच्या बलुतेदार पद्धतीवर अवकळा आल्याने कारागिरांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे .
पूर्वीच्या काळी सुतार, लोहार, कुंभार यांना शेतकऱ्यांच्या जीवनात विशेष स्थान होते. सुतार हा शेतीसाठी लागणारे वखर, नांगर, दरवाजे बनवून द्यायचे. आता हे साहित्य लोखंडी स्वरूपात मजबूत प्रकारात बाजारात मिळत असल्याने त्याचा परिणाम लोहार कारागिरांच्या व्यवसायावर होत आहे. पारंपरिक पद्धतीने कातड्यावर प्रक्रि या करु न पादत्राणे तयार केली जायची. पद्धतीनुसार चपला, जोडे बाजारात उपलब्ध झाल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुंभार मातीला एकजीव करून माठ, सुरई, पणत्या, रांजण तयार करून आपला उदरनिर्वाह चालवित असे. आता या व्यवसायालादेखील उतरती कळा लागली असून या व्यवसायिकांना आता शासकीय मदतीची गरज व्यक्त केली जात आहे.
बाजारपेठेत आधुनिक तंत्राचा व यांत्रिक पद्धतीने बनविलेल्या साधनांनी शिरकाव केल्याने या पारंपरिक व्यावसायिकांनी बनविलेल्या साहित्याला आता विशेष मागणी नसते. त्यामुळे व्यवसाय डबघाईस आले आहेत. जागतिकीकरणात ग्रामीण भागातही या वस्तू सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
ग्रामीण भागात तर कुंभाराचे चाक बंद होण्याच्या मार्गावर आहे. तप्त आगीत लोखंडाला आकार देवून ग्रामस्थांना पावशी, कुऱ्हाड, विळा तयार करणाऱ्या लोहार समाजावर आधुनिकतेमुळे व्यवसाय बंदीचा बडगा आला आहे. या व्यावसायिकांना आता कामाच्या शोधात शहरात भटकंती करावी लागत आहे. त्यांना प्रशिक्षणातून तंत्रज्ञानाची ओळख करून दिल्यास व्यवसायाला संजीवनी मिळेल. (प्रतिनिधी)

Web Title: Traditional business threats due to modern tools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.