चंद्रपुरातून चालतो विदर्भातील गांजाचा व्यापार
By Admin | Updated: March 1, 2015 00:52 IST2015-03-01T00:52:08+5:302015-03-01T00:52:08+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या दारूबंदीच्या घोषणेमुळे समाधान व्यक्त केले जात आहे. असे असले तरी याहून चिंताजनक व गंभीर चित्र गांजामुळे निर्माण होऊ पाहत आहे.

चंद्रपुरातून चालतो विदर्भातील गांजाचा व्यापार
लोकमत संडे स्पेशल
रुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या दारूबंदीच्या घोषणेमुळे समाधान व्यक्त केले जात आहे. असे असले तरी याहून चिंताजनक व गंभीर चित्र गांजामुळे निर्माण होऊ पाहत आहे. याची पाळेमुळे जिल्ह्यात झपाट्याने पसरत आहे. अल्पवयीन मुलांसह तरुण पिढी या व्यसनामुळे गारद होत चालली आहे. गांजाची वाढती मागणी लक्षात घेता तस्करांनी आता रेल्वेच्या माध्यमातून गांजाची तस्करी सुरु केली आहे. दररोज लाखो रुपयांचा गांजा रेल्वे मार्गाने जिल्ह्यात पोहचविला जात आहे व येथून पुढे विदर्भातही पाठविला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांनीही यापूर्वी केलेल्या पाचसहा कारवायामध्ये गांजा रेल्वे मार्गाने आंध्रप्रदेशातून आणला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही रेल्वेमार्गाने होत असलेली गांजांची तस्करी थांबविण्यात पोलिसाना अद्यापही यश का आले नाही, याबाबत आश्चर्य आहे. पोलिसांच्या पाठबळामुळेच शहरात सहजरित्या गांजा मिळत असल्याने युवापिढी व्यसनाधीन होत चालली आहे.
आंध्रप्रदेशातील कागजनगर तसेस मचेंरीयालमधून रेल्वे मार्गांने लाखो रुपयांचा गांजा दररोज बल्लारशाह जंक्शनवर उतरविला जात असल्याची विश्वसनीय माहीती आहे. आंध्रातून आयात होत असलेला गांजा बराच वेळ नागरिकांनी गजबजलेल्या रेल्वे डब्यामध्ये राहतो. अशावेळी गांजाचा वास डब्बाभर पसरण्याची भीती असते. मात्र यावरही गांजा तस्करांनी नामी शक्कल लढविली आहे. गांजाचा वास रेल्वेडब्यात पसरू नये, यासाठी सर्व गांजा एकत्रित न ठेवता त्याचे दोन किलोचे वेगवेगळे गोळे तयार करुन त्यांना जाड कागदात गुंडाळले जाते. त्यानंतर ते जाड खोक्यांमध्ये व्यवस्थित पॅक करुन ठेवले जाते. त्यानंतर हा माल कोणालाही संशय न येता सरळ चंद्रपुरात पोहचविला जातो.
जिल्ह्यात आठ ते दहा मोठे गांजा विक्रेते असून त्यांच्या मार्फत आलेला माल जिल्ह्यातील खेडोपाडी व गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, भंडारा आदी जिल्ह्यात ट्रकच्या माध्यमातून पोहचविण्याचे काम जोरात सुरु आहे. रात्रीच्या सुमारास किंवा पहाटेच्या वेळी बल्लारपुरात पोहचणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून हा माल येतो. बल्लारपुरात हा माल उतरविल्यानंतर तो आॅटोरिक्षा किंवा संबंधित विक्रेत्याच्या खासगी वाहनातून चंद्रपुरात आणला जातो व इप्सितस्थळी उतरविला जातो. म्हणजेच हा अवैध व्यवसात रात्री किंवा पहाटेच्या अंधारातच केला जातो. त्यामुळे कुणाला संशयही येत नाही आणि पोलिसांचा ससेमिराही टाळला जातो.
उल्लेखनीय असे, मागील वर्षी आतंकवादी विरोधी पथकाने काही गांजा तस्करांना पकडले होते. त्यांच्याकडून त्यावेळी लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला होता. पकडलेला गांजा रेल्वे मार्गाने आंध्रप्रदेशातून आणल्याचे उघडकीस आले होते. त्या कारवाईनंतर काही दिवस गांजा तस्कर भूमिगत झाले होते. पण तस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे.
या रेल्वेगाड्यातून होते तस्करी
ओखापुरी, नवजीवन, दक्षिण, बिकानेर, गांधीधाम या रेल्वेगाड्यानमधून मोठ्या प्रमााणात गांजा चंद्रपुरात आणला जात आहे. विशेष म्हणजे, या सर्व गाडया रात्री तर काही पाहाटेच्या वेळेत बल्लारपुरात दाखल होतात. यावेळी काळोखच असतो.
फोनवरुन होते गांजाची बुकिंग
मोठ्या व्यापाऱ्यांकडून फोनवरुनच मालाची बुकिंग केली जाते असून आंध्रातून चंद्रपूरपर्यंत माल आणण्याची जबाबदारी आंध्रातील व्यापाऱ्यांची असते. चंद्रपुरात माल उतरविल्यानंतर पैशाची देवाणघेवाण होते व नंतर स्थानिक व्यापाऱ्यांकडे माल सोपविला जातो
रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस अनभिज्ञ कसे
मागील अनेक दिवसांपासून न चुकता हा अवैध व्यवसाय सुरू आहे. गांजा आंध्रातून बल्लारपुरात आणल्यानंतर तो येथील व्यापाऱ्यांच्या ताब्यात देताना अर्ध्या तासाचा कालावधी लागतो. तरीही आजपर्यंत रेल्वे व स्थानिक पोलिसांना याची भनक लागू नये, याचे आश्चर्य वाटते. यात पोलिसांचेही हात ‘ओले’ झाले तर नसावे, अशी शंका उपस्थित होत आहे.
एटीएस पथकाने केल्या होत्या कारवाया
मागील वर्षी पोलिसांच्या एटीएस पथकाने गांजाविरोधी कारवाया करीत एक लाखाचा गांजा जप्त केला होता. विशेष म्हणजे महाकाली चौकीसमोरुन दोघांना अटक केली होती. पुढे पोलिसांच्या तपासात आंध्रप्रदेशातील ठोक विक्रत्यांची नावे उघडकीस आली होती. जप्त केलेला गांजा रेल्वे मार्गाने आंध्रातून आणल्याची कबुली आरोपींनी दिली होती. यात एका महिलेचाही समावेश होता.