सोमनाथ धबधब्यात पर्यटक वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:25 IST2017-10-01T23:25:45+5:302017-10-01T23:25:57+5:30
गेल्या आठवड्यात या परिसरात दोन तास दमदार पाऊस आला. त्यामुळे आतापर्यंत नाराज असलेला सोमनाथ येथील धबधब्याचा आवाज त्यांच्या वाढलेल्या प्रवाहामुळे खुललेला आहे.

सोमनाथ धबधब्यात पर्यटक वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
मारोडा : गेल्या आठवड्यात या परिसरात दोन तास दमदार पाऊस आला. त्यामुळे आतापर्यंत नाराज असलेला सोमनाथ येथील धबधब्याचा आवाज त्यांच्या वाढलेल्या प्रवाहामुळे खुललेला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे.
डोंगरदरीतून झिरपत येणारा व शंकर भगवानच्या बाजूच्या कड्यावरुन कोसळणारा हा मूल तालुक्यातील धबधबा मनोवेधक आहे. हिरव्याकंच वनराईत व वनफुलांच्या सुंगधात याच्या शेजारी सोमनाथ (शंकर)चे नामस्मरण करीत डोळे मिटण्याचा आनंद हा जेष्ठांसाठी परमानंदच असतो. अलिकडच्या काळात तर तरुणार्इंसाठी हा धबधबा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. दिवसरात्र काबाडकष्ट, दैनंदिन कामकाजाला जरा वेळ दूर करुन आपल्या कुटुंबासोबत मस्त मजेत भोजनाचा आनंद घेताना अनेक कुटुंब या ठिकाणी दिसतात. विशिष्ट हंगामात कामे आटोपून हिवाळ्यात पत्रावळीत सहभोजनासाठी सोमनाथसारखे सुंदर ठिकाण नाही. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढतेय. या गर्दीमुळे थोडीफार अस्वच्छता होत होती. ती आता ग्रामपंचायतीने दूर केलेली आहे. या स्वच्छ, सुंदर व निर्मळ ठिकाणी आंब्याच्या हिरवाईत पाखरांची सनई ऐकावयास मिळते. दिवसेंदिवस सोमनाथला पर्यटकांची गर्दी वाढतेय ती त्यांच्या सर्वांगसुंदर सौंदर्यामुळेच.