सिंधबोडीत पर्यटकांची मांदियाळी
By Admin | Updated: April 18, 2016 01:09 IST2016-04-18T01:09:39+5:302016-04-18T01:09:39+5:30
तालुक्यात समृध्द वनवैभवाची परंपरा आहे. वनविभागातंर्गत कच्चेपार जंगलातील कक्ष क्रमांक १३५ मध्ये सिंधबोडी

सिंधबोडीत पर्यटकांची मांदियाळी
सिंदेवाही : तालुक्यात समृध्द वनवैभवाची परंपरा आहे. वनविभागातंर्गत कच्चेपार जंगलातील कक्ष क्रमांक १३५ मध्ये सिंधबोडी तलावाचा परिसर हे एक रमणीय स्थळ आहे. हा परिसर गुढीपाडव्याच्या शुभपर्वावर पर्यटनासाठी खुला करण्यात आला. त्यामुळे या परिसरात पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.
गुढीपाडव्यापासून या परिसरात शेकडो पर्यटकांनी भेट दिली. सिंदेवाहीपासून सात किलोमीटर अंतरावर कच्चेपारपासून पाच किलोमीटर पूर्वेस अंतरावर सिंधबोडी तलाव आहे. हे ठिकाण जंगलाच्या मध्यभागी असून त्याला लागुन भिवकुंड तलाव आहे. कक्ष क्रमांक १३४ मध्ये मरेगाव, खैरी, मुरपार, चिटकी तलाव असल्याने सिंधबोडी तलावात भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध आहे. तलावाला लागून डोंगर असल्याने वन्यप्राण्यांच्या वास्तव्यासाठी हा परिसर पोषक आहे. जंगल ४१६ चौरस हेक्टर क्षेत्रात असून सिंधबोडी तलाव १० हेक्टर परिसरात पसरला आहे. परिसरात दहा पट्टेदार वाघ असल्याची नोंद आहे. हरीण, गवा, चितळ, सांबर, निलगाय, बिबट, अस्वल, रानडुकर, तडस आदी प्राण्यांचा मुक्तसंचार आहे. विदेशी पक्षीही मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून हा परिसर ताडोबापेक्षा सुंदर असल्याचे मत येथे येणारे पर्यटक व्यक्त करतात. येथील वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांनी या पर्यटनस्थळावर सर्वाधिक परिश्रम घेतले. शासनाने या पर्यटनस्थळाकडे लक्ष देऊन या परिसराचा विकास केल्यास विदर्भात ताडोबानंतर पर्यटक सिंदेवाहीच्या सिंधबोडी पर्यटन स्थळाला नक्की भेट देतील, अशी अपेक्षा आहे. हे पर्यटनस्थळ खुले झाल्यापासून दहा दिवसांत हजारो पर्यटकांनी भेट दिल्याच्या नोंदी आहेत. एफ.डी.सी.एम.ने पर्यटकांसाठी केलेली शुल्क आकारणी कमी करावी, अशी मागणी होत आहे. यामुळे या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. (शहर प्रतिनिधी)