चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाबाहेरही पर्यटन सफारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:36+5:302021-02-05T07:40:36+5:30
जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ताडोबात वाघ व वन्य जिवांच्या सुरक्षेसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे वाघांची ...

चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाबाहेरही पर्यटन सफारी
जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ताडोबात वाघ व वन्य जिवांच्या सुरक्षेसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे वाघांची संख्या वाढली. तृणभक्षी प्राणी मोठ्या संख्येत अधिवास करीत असल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. जगभरातील पर्यटक भारतात आले की, ताडोबात पर्यटन केल्याशिवाय परत जात नाही. वाघ व वन्यप्राणी, वनसंपदेची सुरक्षा व संवर्धनाकडे मागील काही वर्षांपासून वन विभागाने विशेष लक्ष दिल्याने ताडोबा क्षेत्राबाहेरही वन्य प्राण्यांची संख्या वाढली. अशा क्षेत्रातही पर्यटन सफारी होऊ शकते, हे लक्षात आल्याने वन विभागाने बल्लापूर वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कारवा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांना सोबतीला घेतले. पर्यटन सफारीचे महत्त्व समजल्यानंतर समितीने काही दिवसांपूर्वीच ठराव पारित केला. नियोजनाप्रमाणे प्रजासत्ताकदिनी पर्यटन सफारीचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक अ. द. मुंढे व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच पर्यटक उपस्थित होते.
स्थानिकांना मिळणार रोजगार
कारवा वन क्षेत्रात वाघ व विविध वन्य प्राण्यांची संख्या लक्षवेधी आहे. आतापर्यंत २०० प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झाली. दिवसातून सकाळी ६. ते १० वाजता आणि दुपारी २ ते ४ वाजता प्रत्येकी चार वाहने सोडण्यात येणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर खासगी वाहनांना प्रवेश देणे सुरू झाले. भविष्यात नोंदणीकृत वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. स्थानिक युवकांना गाइड म्हणून प्रशिक्षित केले जात आहे. कारवा येथील सफारीसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या संकेतस्थळावरूनच पर्यटकांना बुकिंगची सुविधा उपलब्ध होईल. या पर्यटन सफारीमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्य वनसरंक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिली.