पर्यटनाच्या दर्जापासून आसोलामेंढा उपेक्षित

By Admin | Updated: May 10, 2015 01:10 IST2015-05-10T01:10:07+5:302015-05-10T01:10:07+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात सुमारे १०० वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या ब्रिटिश राजवटीतील आसोलामेंढा ...

Tourism is neglected by the quality of tourism | पर्यटनाच्या दर्जापासून आसोलामेंढा उपेक्षित

पर्यटनाच्या दर्जापासून आसोलामेंढा उपेक्षित

उदय गडकरी सावली
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात सुमारे १०० वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या ब्रिटिश राजवटीतील आसोलामेंढा तलावाच्या परिसराला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, यासाठी तालुक्यातील नागरिक मागील १२ वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. मात्र त्यांची ही मागणी शासनदरबारी उपेक्षितच राहिली आहे.
चंद्रपूर जिल्हा हा जसा खनीज संपत्ती आणि जंगलव्याप्त भाग म्हणून प्रसिद्ध आहे. तसाच या जिल्ह्यात पर्यटनासाठीही अनेक चांगली स्थळे आहेत. ताडोबा, अंधारी, कोळसा, अलीकडेच जाहीर झालेले घोडाझरी या पर्यटन स्थळाप्रमाणेच इतर अनेक स्थळे पर्यटन स्थळे बनन्याइतपत योग्य आहेत. अशाच केंद्रापैकी आसोलामेंढा तलाव एक आहे. शासनाने आतापर्यंत या स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून मान्यता दिली नसली तरी दैनंदिन जीवनातील धकाधकीच्या रगाड्यातून मन:शांती मिळण्यासाठी बदल म्हणून आसोलामेंढा तलावाचा फेरफटका मारणे निश्चितच सुखावह ठरेल.
निसर्गाने विविध रंगाची उधळण केलेल्या व वनवैभवाने समृद्ध असलेल्या हिरव्यागार रम्य परिसरात या तलावाची निर्मिती १८९० ते १९०५ या कालखंडात करण्यात आली. १५ वर्षात निर्माण करण्यात आलेल्या तलावासाठी १८ लक्ष आठ हजार ४५६ रुपयांचा खर्च करण्यात आला. दुष्काळ निवारणार्थ व मजुरांना काम मिळावे या दृष्टीने सदर तलाव इंग्रजांनी निर्माण केल्याचे समजते. ९९१९ हेक्टर जमिनीला सिंचित करण्याएवढी या तलावाची क्षमता आहे. २.५ किमी लांब व १८७ मीटर उंचीची पाळ असलेल्या आसोलामेंढा धरणात ९२.१७ दशलक्ष पाणी साठविण्याची क्षमता आहे. या परिसरात वन्यजीव, हिरवीगार वनसंपदा व जलसंपदा मनाला भुरळ पाडणारी तर आहेच. परंतु २३० मीटरच्या सांडव्याखाली सहा-सहा फुटाचे चार प्रपात आहेत. जलाशय पूर्ण भरल्यानंतर सांडवा व प्रपातावरुन वाहत असणाऱ्या पाण्याचे दृश्य विलोभनीय दिसते. त्या परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पर्यटकांना कधी-कधी वन्यप्राण्यांचेही दर्शन घडते. या परिसरात पट्टेदार वाघ आणि बिबटांचा मुक्त संचार असल्याचे बोलले जाते. शिवाय या तलावावर देश-विदेशातून पक्षी स्थलांतर करून येतात. शासनाने याकडे लक्ष देऊन येथे बर्ड सॅक्युरी स्थापन केली असती तर इतर क्षेत्रांप्रमाणेच आसोलामेंढाही एक सुंदर पर्यटनस्थळ बनले असते. १८९० मध्ये जी दूरदृष्टी इंग्रजांनी दाखविली ती आजपर्यंतही भारतीय राजकारण्यांना लाभली नाही. त्यामुळे आसोलामेंढासारखी अनेक केंद्रे उपेक्षित आहेत. महाराष्ट्र शासनाने आसोलामेंढा तलावाकडे केवळ सिंचनाची एक सोय या दृष्टीने न पाहता. या केंद्राचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विचार करावा. शासनाच्या थोड्याशा प्रयत्नाने चंद्रपूर जिल्हा पर्यटनाच्या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकू शकतो. निसर्गाच्या सोबतीला थोडी शासनाचीही मदत मिळाली तर केवळ या जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भासोबतच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचीही पावले एकदा तरी आसोलामेंढाकडे वळतील, यात शंकाच नाही.

Web Title: Tourism is neglected by the quality of tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.