चंद्रपूरकरांच्या वाहनांवर टोलचे ओझे
By Admin | Updated: August 9, 2014 01:34 IST2014-08-09T01:34:52+5:302014-08-09T01:34:52+5:30
टोलनाक्यांवरून होणाऱ्या वसुलीच्या सरकारी खेळात चंद्रपूरकरांसह विदर्भातील वाहनधारक नागरिक भरडले जात आहे.

चंद्रपूरकरांच्या वाहनांवर टोलचे ओझे
चंद्रपूर : टोलनाक्यांवरून होणाऱ्या वसुलीच्या सरकारी खेळात चंद्रपूरकरांसह विदर्भातील वाहनधारक नागरिक भरडले जात आहे. राज्यातील बंद पडलेल्या अन्य टोल नाक्यांच्या वसुलीचा भार चंद्रपुरातील टोल नाक्यांवर सोपवून सरकारी तिजोरी भरण्याचा प्रकार सुरू झाल्याने जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने अलीकडे नऊ टोल नाके बंद केले आहे. त्या नाक्यांच्या माध्यमातून जमवणारी आवक बंद झाल्याने इतर टोल नाक्यांच्या माध्यमातून त्या रकमेच्या वसुलीची तरतुद केली आहे. चंद्रपूरलगतच्या ताडाळी येथील टोल नाक्याची नेहमी वाढणारी मुदत हे त्यातीलच उदाहरण असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात २०१३ मध्ये या टोल नाक्याची मुदत संपली होती. मात्र त्याला तीन वर्षांची मुदतवाढ देवून ती २०१६ पर्यंत वाढ करण्यात आली. राज्यातील नऊ टोलनाक्यांचाही भार ताडाळीतील नाक्यावर पडणार असल्याने २०१६ वरून या टोलनाक्याची मुदत २०२४ पर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.
या संदर्भातील माहितीनुसार, १९९८ मध्ये ताडाळी येथील टोल नाका सुरू करण्यात आला होता. मात्र २००० पर्यंत कसलीही वसुली न झाल्याचे सांगून कोणताही हिशेब सादर केला नव्हता. २००० या वर्षापासून २०१२ पर्यंतच्या सादर करण्यात आलेल्या हिशेबानुसार, ८८ कोटी रूपयांची वसुली अद्यापही बाकी असल्याचे सांगितले जात आहे.
त्यानंतर २०१३ च्या हिशेबामध्ये फक्त ५० कोटी २४ लाख रूपयांची वसुली झाल्याचे सांगून या टोल नाक्यावरील वसुलीची मुदत २०१६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)