तृतीयपंथियांकडे अद्ययावत प्रसाधनगृहाची देखभाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:46 IST2018-04-26T00:46:44+5:302018-04-26T00:46:44+5:30
शासन अनेक कायदे करते, सामजिक सुधारणा करते. मात्र मानसिकता बदलायला वेळ लागतोच. त्यासाठी हवा असतो प्रत्यक्ष सामाजिक सहभाग. समाजातील तृतीयपंथी यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने असाच एक नवा प्रयोग केला आहे.

तृतीयपंथियांकडे अद्ययावत प्रसाधनगृहाची देखभाल
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासन अनेक कायदे करते, सामजिक सुधारणा करते. मात्र मानसिकता बदलायला वेळ लागतोच. त्यासाठी हवा असतो प्रत्यक्ष सामाजिक सहभाग. समाजातील तृतीयपंथी यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने असाच एक नवा प्रयोग केला आहे. तृतीयपंथियांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेकडे प्रसाधनगृहाची देखभाल करण्याचे कंत्राट दिले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्ही गेलात, तर या अद्ययावत प्रसाधनगृहाचा वापर करा आणि यातून होणारी मदत लक्षात घेता आपलेही सामाजिक दायित्व पूर्ण करा!
समाजामध्ये तृतीयपंथीयांना मिळणारी वागणूक आणि त्यामागची पारंपारिक मानसिकता बदलली पाहिजे, यासाठी जिल्ह्यामध्ये चंद्रपूर आणि वरोरा या ठिकाणी संबोधन ट्रस्टमार्फत समाजोपयोगी कार्य चालते. त्याचाच एक भाग म्हणून तृतीयपंथी, देहविक्रय करणाºया महिला आणि समलैंगिक यांच्या (एलजीबीटी) सामाजिक उत्थानासाठी कार्य करणाºया या संस्थेने सार्वजनिक ठिकाणच्या उपक्रमासाठी या संस्थेच्या सदस्यांना काम देण्याची मागणी केली होती.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी या मागणीतून हे अद्ययावत प्रसाधनगृह कंत्राटी पद्धतीने चालविण्याचा निर्णय घेतला. संबोधन ट्रस्टला हे काम एक वर्षासाठी देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात रोज शेकडो नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह निर्माण करण्यात आले आहे.
कर्मचाºयांसाठी स्वत:चे प्रसाधनगृह आहेत. मात्र सार्वजनिक वापरासाठी या ठिकाणी प्रसाधनगृहाची आवश्यकता होती. या प्रसाधनगृहामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा सत्र न्यायालयात येणाºया नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
कधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलात तर या प्रसाधनगृहाचा निश्चित वापर करून एका सामाजिक घटकाला न्याय द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रसाधनगृहाचे नुकतेच अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी लोकार्पण केले.