आजपासून किलबिलाट
By Admin | Updated: June 26, 2015 01:08 IST2015-06-26T01:08:56+5:302015-06-26T01:08:56+5:30
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या २६ जून रोजी सुरु होणार आहेत.

आजपासून किलबिलाट
शिक्षण विभाग सज्ज : प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी
चंद्रपूर : शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या २६ जून रोजी सुरु होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विविध उपक्रमासह प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार असून दाखलपात्र सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी केली असून शुक्रवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.
शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून यासाठी क्षेत्रीय अधिकारी शाळेत उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी प्रभात फेरी तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात येणार असून इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या बालकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले जाईल. तसेच शालेय पोषण आहारात गोड पदार्थाचा समावेश करण्यात येणार आहे. शाळेत दाखलपात्र प्रत्येक मुलाचा व शाळाबाह्य मुलाचा शोध घेवून नियमित शा२ळेत प्रवेश देण्याचा उपक्रम राबविला जाणार असून विशेषत: प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर सर्व मुलींना शाळेत दाखल करुन घेतले जाणार आहे.
विशेष गरजाधिष्ठित मुले, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती-जमाती, वंचित घटकातील सर्व मुले शाळेत दाखल करुन घेण्यासाठी पुढाकार घेतला जाणार असून या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व नोट बुकचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी १०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती आणि दर्जा शिक्षणाचा निर्धार प्रवेशोत्सव दिनी करण्यात येणार असून यासाठी महिला बचत गटांचे सहकार्य घेतले जाईल, असे शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पाठ्यपुस्तके पोहोचली
शुक्रवारपासून सर्व शाळांची घंटा वाजणार असून दाखलपात्र सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. सर्व शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचवण्यात आली असून गुरूवारी अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली. तशा सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.
लोकप्रतिनिधी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत
शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना दाखल करून घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहचविण्यासाठी पालकमंत्री, खासदार तसेच लोकप्रतिनिधी यांना जिल्ह्यातील एका शाळेत प्रवेशोत्सवासाठी हजर राहण्यासंबंधी शिक्षण विभागाकडून विनंती केली जाणार आहे.
खुटाळा व घुग्घूस येथे कार्यक्रम
दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी घुग्घूस व खुटाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले व जिल्हा परिषदेचे अन्य पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.