आजचे साहित्य उद्याचे क्रांतिपर्वच

By Admin | Updated: February 15, 2015 00:44 IST2015-02-15T00:44:46+5:302015-02-15T00:44:46+5:30

समाजात जे अत्याचारी असेल, विनाशकारी असेल, त्यांच्यावर साहित्यातून वार केला पाहिजे. रंजल्या गांजल्यांना पुढे आणण्यासाठी, वर आणण्यासाठी साहित्य लेखण व्हायला हवे.

Today's literature is about revolution of tomorrow | आजचे साहित्य उद्याचे क्रांतिपर्वच

आजचे साहित्य उद्याचे क्रांतिपर्वच

चंद्रपूर : समाजात जे अत्याचारी असेल, विनाशकारी असेल, त्यांच्यावर साहित्यातून वार केला पाहिजे. रंजल्या गांजल्यांना पुढे आणण्यासाठी, वर आणण्यासाठी साहित्य लेखण व्हायला हवे. आजचे साहित्य उद्याचे क्रांतीपर्व ठरणार आहे, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. विनायक तुमराम यांनी व्यक्त केला. मात्र साहित्यात राजकारण आणू नका. साहित्याने माणसे जोडतात, त्याने माणसे तोडणे शिकवू नका, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूरद्वारा आयोजित जिल्हा साहित्य संमेलनाचे शनिवारी दुपारी १२ वाजता येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द साहित्यिक डॉ. राजन जयस्वाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैैसेकर, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रामू तिवारी, रमेश मामीडवार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नगरसेवक संजय वैद्य, सुर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख उपस्थित होते.
यावेळी तुमराम पुढे म्हणाले, आपण प्रारंभी कविता लिहिल्या. मग साहित्यात रस घातला. रंजल्यागांजल्यांच्या जीवनाचा संघर्ष आपल्या साहित्याचा विषय झाला. आपल्याकडे आदिवासी, झाडीबोली, आंबेडकरी यासारखे विविध साहित्य लेखण होत आहे. कोणतेही साहित्य असो, साहित्याचे शेवटचे इप्सित माणसांना जोडणे हेच आहे, हे विसरता कामा नये. माणूस आकाशात पक्ष्यासारखा उडतो, पाण्यात मास्यासारखा पोहतो. मात्र माणसाला माणूसपण शिकविण्याचे काम साहित्य करीत आहे. नवीन कवींवर टिका केली जात आहे. गाजरगवताचे पिक निघाले, असे त्यांना संबोधले जात आहे. त्यामुळे नवोदित कवींनी याचे भान ठेवून काव्यलेखन केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी नवकवींना दिला.
अध्यक्षीय भाषण करताना डॉ. राजन जयस्वाल म्हणाले, चंद्रपुरात साहित्यिकांची कमी नाही तशीच साहित्यरसिकांची कमी नाही. मराठी भाषा संपते की काय, असे म्हणत भीतीचा गोळा उठविणाऱ्या माणसांपासून दूर रहा. ११ कोटी लोकांना जी भाषा बोलता येते, त्या भाषेची आपण लेकरं आहोत, याचा अभिमान बाळगला तर न्यूनगंड आपोआपच दूर होईल. मराठीचा जेवढा कोष वाड्:मय आहे, तेवढा कोणत्याही भाषेचा नाही. निसर्ग आपल्या आयुष्याशी कसे नाते साधतो, याचे उदाहरण देताना जयस्वाल म्हणाले, ज्याप्रमाणे येथील वर्धा आणि वैनगंगा नदी विविध ठिकाणाहून प्रवाहित होऊन एकमेकांना मिळतात व तिथे आपले नाव सोडून प्राणहिता नावाने पुन्हा प्रवाहित होतात, तसेच आपल्या आयुष्याचे आहे. आयुष्याचा प्रवासही तसाच आहे. झाडीपट्टीतील नाट्यलेखण उपेक्षित राहिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. वडसा, देसाईगंज या ठिकाणी दरवर्षी दोनशे नाटकं लिहिली जातात. पाच कोटींची उलाढाल होते. मात्र ही नाटकं प्रकाशित केली जात नाही.
समाजात साहित्याचे महत्त्व मोठे आहे. साहित्यातून त्या प्रदेशाची संस्कृती कळते. आपणही बालपणांपासून विविध साहित्यिकांची पुस्तके वाचली आहे. या साहित्यांचा आपल्या आयुष्यावरही सकारात्मक परिणाम झाला असल्याचे मनोगत जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले. यावेळी शांतराम पोटदुखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष संजय वैद्य यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. संचालन गिता देव्हारे व तनुजा बोढाले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
कुल नाही आणि गुरूही नाही
गडचिरोली येथील नव्या विद्यापिठाला गोंडवाना विद्यापीठ असे नाव दिले. आदिवासी बांधवांसाठी ही सन्मानाची बाब आहे. मात्र आदिवासी बांधवांमध्ये क्षमता असतानाही त्यांना कुलगुरू पद बहाल केले नाही. दुसऱ्यांदा तरी या विद्यापिठात आदिवासीला कुलगुरू पद देऊन आदिवासींना न्याय दिला जाईल, असे वाटले होते. मात्र दुसऱ्यांदाही हा मान इतरांनाच देण्यात आला. आदिवासींना कुलही होऊ दिले नाही आणि गुरूही होऊ दिले नाही, अशी खंत यावेळी डॉ. विनायक तुमराम यांनी व्यक्त केली.
चंद्रपुरातील रसिकांची प्रशंसा
चंद्रपुरात दोनदा अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. या दोन्ही संमेलनात चंद्रपुरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सारस्वतांचा जोश वाढविला. या संमेलनांचे अध्यक्ष वामन चोरघडे व वसंत आबाजी डहाके हे चंद्रपूरच्या रसिकतेने भारावून गेले होते. त्यांनी येथील साहित्यरसिकांची जाहीरपणे प्रशंसा केल्याची माहिती डॉ. राजन जयस्वाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली.

Web Title: Today's literature is about revolution of tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.